महाराष्ट्रावर अन्याय… गुजरातवर मेहेरबानी! मुंबईच्या एसी लोकलचा प्रवास ‘नमो भारत रॅपिड रेल’पेक्षा महाग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एसी लोकलच्या महागडय़ा तिकीट दरांच्या माध्यमातून रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासन मुंबई-महाराष्ट्रावर अन्याय करीत असल्याचे उघड होत आहे. गुजरातमध्ये धावणाऱया वातानुकूलित ‘नमो भारत रॅपिड रेल’पेक्षा मुंबईच्या एसी लोकलचा प्रवास महागडा आहे. ‘नमो भारत रॅपिड रेल’साठी प्रति किमी 1 रुपया 20 पैसे भाडे आकारले जाते, तर मुंबईतील एसी लोकलसाठी प्रति किमी 1 रुपया 40 पैसेप्रमाणे तिकीट दर लागू आहे.

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया लोकलचा प्रवास सर्वसामान्यांसाठी ‘मरणयातना’ देणारा ठरला आहे. उपनगरी रेल्वेच्या पश्चिम, मध्य व हार्बर मार्गावर एसी लोकल धावत आहेत. या गाडय़ांनी सामान्यांच्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत केले आहे. त्यामुळे एसी लोकलचे महागडे तिकीट वादाचा मुद्दा बनला आहे. गुजरातमध्ये ‘नमो भारत रॅपिड रेल’ (आधीची वंदे मेट्रो) भुज ते अहमदाबाद मार्गावर चालवण्यात येत आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असूनही या गाडीचे भाडे प्रति किमी 1 रुपया 20 पैसे आहे. त्यानुसार किमान तिकिटाचा दर 30 रुपये आहे. या गाडीची मुंबईतील एसी लोकलशी तुलना केल्यास जादा तिकीट दर आकारून मुंबईकरांची लूट सुरू आहे. मुंबईच्या एसी लोकलमधून प्रवास करताना ‘सिंगल जर्नी तिकीट’साठी प्रति किमी 1 रुपया 40 पैसे मोजावे लागत आहेत. प्रत्येक किमीला 20 पैसे जादा आकारले जात असल्यामुळे एसी लोकलचे किमान भाडे 35 रुपयांवर गेले आहे. ‘नमो भारत रॅपिड रेल’ आणि मुंबईतील एसी लोकल दोन्ही सारख्याच आरामदायी गाडय़ा आहेत. असे असताना रेल्वे बोर्डाने दोन राज्यांना वेगवेगळा तिकीट दर कसा लागू केला आहे, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

रेल्वेतून 90 टक्के सामान्य लोक प्रवास करतात, तर 10 टक्के व्यावसायिक वा उच्च हुद्दय़ावरील प्रवासी असतात. रेल्वे ही सामान्य प्रवाशांची आहे. रेल्वेकडे व्यवसाय म्हणून बघितले जाऊ नये. रेल्वे बोर्डाचे धोरण सर्व राज्यांसाठी सारखेच असले पाहिजे. दोन राज्यांसाठी वेगळे तिकीट दर आकारण्याच्या धोरणाला आमचा विरोध आहे.
– मधु कोटियन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ

लोकलचा प्रवास दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. असे असताना रेल्वे बोर्ड एसी लोकलच्या महागडय़ा तिकिटाद्वारे प्रवाशांची लूट करीत आहे. मुंबईतील एसी लोकललादेखील जीवघेणी गर्दी असते. अशा स्थितीत रेल्वे बोर्ड गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये दुजाभाव का करतेय? – वंदना सोनावणे, अध्यक्षा, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना

Comments are closed.