ज्योतिषाकडूनच 72 लाखांचा चुना; शेअर मार्केटमधून मोठ्या परताव्याचं आमिष दाखवलं, नाशिकमधील घटना

नाशिक क्राईम न्यूज : शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नाशिकमधील (Nashik) एका ज्योतिषाने गुंतवणूकदाराला तब्बल 72 लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शरणपूर रोड परिसरात ‘अंजनिय ज्योतिष केंद्र’ चालवणाऱ्या सचिन देशमुख याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नाशिक सायबर पोलीस ठाण्यात (Nashik Cyber Police Station) दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन देशमुख याने स्वतःला अनुभवी ज्योतिष आणि शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणून सादर केले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सुरुवातीला ऑनलाइन मीटिंग्स, झूम कॉल्स तसेच कार्यालयात प्रत्यक्ष भेटी घेतल्या. “शेअर मार्केटमध्ये योग्य वेळी गुंतवणूक केल्यास मोठा नफा निश्चित मिळतो,” असे सांगत त्याने गुंतवणूकदारांना आकर्षित केले.

Nashik Crime News: सुरुवातीच्या काही गुंतवणुकीवर नाममात्र परतावा

विश्वास अधिक दृढ करण्यासाठी त्याने सुरुवातीच्या काही गुंतवणुकीवर नाममात्र परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि त्यांनी टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा गुंतवण्यास सुरुवात केली. मात्र, काही काळानंतर परतावा देणे अचानक थांबवण्यात आले. पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ, विविध कारणे आणि खोटी आश्वासने देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Nashik Crime News: 72 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित गुंतवणूकदारांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात एकूण 72 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम कुठे व कशी वळवली, इतर बळी आहेत का? याचा तपास सुरू आहे.

Nashik Crime News: प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो किंवा कोणत्याही गुंतवणुकीबाबत भरघोस परताव्याचे आमिष दाखवणाऱ्यांपासून सावध राहावे. अधिकृत नोंदणी, परवाने आणि व्यवहारांची खातरजमा केल्याशिवाय गुंतवणूक करू नये. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik MNS: ‘फिजिक्सवाला’मधील कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं, नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्…; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.