शॉकींग! महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या

अहिल्यानगर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका किरकोळ वादाशिवाय सुरळीतपणे पार पडल्या. मात्र, महापालिका निवडणुकांवेळी काही ठिकाणी खुनाच्या घटना घडल्याने निवडणुकांमधील राजकीय वाद पुन्हा एकदा आव्हान बनल्याचं दिसून आलं. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या वादाचे पडसाद थेट आता गोळीबार करण्यापर्यंत उमटल्याचं दिसून आलं. येथील अबरार शेख या युवकावर नगरमधील राज चेंबर याठिकाणी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मित्र आणि स्थानिकांच्या मदतीने अबरारला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

अबरार शेख याला मनपा निवडणुकीच्या वेळेस किरकोळ कारणातून मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी अबरारने पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली. त्याचा राग मनात धरून अबरार शेख याच्यावर काल रात्री 11 वाजताच्या सुमारास चार गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. महापालिका निवडणुकीच्या वादातूनच हा गोळीबार झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. मात्र, पोलीस तपासातच घटनेचं सत्य समोर येणार आहे. अबरार शेख याच्या कंबरेत गोळी लागल्याने अबरार शेख गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांच्या वार्षिक तपासणी दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

आरोपीला न्यायालय परिसरातच मारहाण

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर येथे अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन करण्याच्या प्रकरणातील आरोपीवर न्यायालयात हल्ला झाल्याची घटना समोर आली. श्रीरामपूर न्यायालयाबाहेर संतप्त महिलांनी आरोपीवर हल्ला केला. न्यायालयात हजर करण्यासाठी आरोपीला घेऊन जात असताना हा प्रकार घडला. अल्पवयीन मुलींसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या आरोपी सचिन गोणारकर यास महिलांनी चोप दिला. प्राथमिक शाळेतील चार चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्याच्या प्रकरणातील गोणारकर हा आरोपी आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही शिक्षा देतो अशा संतप्त प्रतिक्रिया महिला पालकांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा

अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर

आणखी वाचा

Comments are closed.