किम जोंग ऊन यांचा सत्तेचा वारसदार ठरला! परिवारातील व्यक्तीच सांभाळणार धुरा; दक्षिण कोरियाचा दावा
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यानंतर सत्तेची सूत्रे कोणाकडे जाणार, या प्रश्नाचे उत्तर आता स्पष्ट होताना दिसत आहे. दक्षिण कोरियाच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस’ने (NIS) यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘किम जोंग उन यांची १३ वर्षीय मुलगी ‘किम जु अये’ (Kim Ju Ae) हिला अधिकृतपणे उत्तराधिकारी म्हणून समोर आणले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे किम घराण्याची सत्ता चौथ्या पिढीकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत.
दक्षिण कोरियाच्या खासदारांना दिलेल्या गुप्त माहितीनुसार, गुप्तचर संस्थेने यापूर्वी किम जु अये हिचा उल्लेख ‘प्रशिक्षणार्थी’ असा केला होता. मात्र, आता ती ‘उत्तराधिकारी निश्चित’ (Successor-designate) या टप्प्यावर पोहोचली असल्याचे सांगण्यात आले आहे. फेब्रुवारी अखेरीस होणाऱ्या उत्तर कोरियाच्या ‘वर्कर्स पार्टी’च्या अधिवेशनात यासंदर्भात औपचारिक घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांमधील वाढती उपस्थिती नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा क्षेपणास्त्र चाचणीच्या वेळी जगासमोर आलेल्या किम जु अयेची सक्रियता वाढली आहे. तिने आपल्या वडिलांसोबत लष्करी परेड, फॅक्टरी भेटी आणि अगदी गेल्या वर्षी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या शिखर परिषदेलाही हजेरी लावली होती. उत्तर कोरियातील सरकारी प्रसारमाध्यमे तिचा उल्लेख ‘आदरणीय’ आणि ‘मार्गदर्शक व्यक्ती’ असा करू लागली आहेत, जे शब्द केवळ सर्वोच्च नेत्यांसाठीच वापरले जातात.
ऐतिहासिक बदल?
१९४८ मध्ये स्थापन झाल्यापासून उत्तर कोरियावर केवळ किम घराण्यातील पुरुषांनीच राज्य केले आहे. जर किम जु अये सत्तेवर आली, तर या पितृसत्ताक व्यवस्थेत तो एक ऐतिहासिक बदल ठरेल. किम जोंग उन यांना स्वतःला सत्तेवर येण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला होता, त्यामुळेच ते आपल्या मुलीला लवकर तयार करत असावेत, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
उत्तर कोरियाने अधिकृतपणे अद्याप तिच्या नावाची पुष्टी केलेली नाही, मात्र ‘किम जु अये’ हे नाव अमेरिकन बास्केटबॉल स्टार डेनिस रॉडमन याने २०१३ मध्ये दिलेल्या भेटीनंतर चर्चेत आले होते.
Comments are closed.