T20 WC26: इंग्लंडचे टेंशन वाढवणारा नेपाळ ईटलीकडून पराभूत, वाचा नक्की काय झाले सामन्यात

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (गुरूवार, १२ फेब्रुवारी) दुसरा सामना ईटली विरुद्ध नेपाळ यांच्यात खेळला गेला. हा सामना सुरू होण्याआधी नेपाळ जिंकेल की काय असे वाटत होते, त्यामागचे कारण त्यांनी मागील सामन्यात जवळपास इंग्लंडचा पराभवच केला होता. आजच्या सामन्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ईटलीने या सामन्यात १० विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. क्रिशन कालुगामेगेने त्याच्या फिरकीने नेपाळच्या फलंदाजांना त्रस्त केले. त्यानेच उल्लेखनीय कामगिरी करत ‘प्लेयर ऑफ द मॅच’च पुरस्कार पटकावला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ईटलीचा कर्णधार हॅरी मॅनेंटीने नाणेफेक जिंकत नेपाळला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. कारण नेपाळ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. त्यांच्या एकाही खेळाडूने अर्धशतकी खेळी केली नाही किंवा ३० पेक्षा अधिक धावा केल्या नाही. त्यांच्यामध्ये सर्वाधिक धावा आरिफ शेखने केल्या.
आरिफने २४ चेंडूत २७ धावा केल्या. तसेच कर्णधार रोहित पौडेल सोबत ४१ धावांची आणि दिपेंद्र सिंग एरीसोबत ४४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे नेपाळने १९.३ षटकात सर्वबाद १२३ धावसंख्या उभारली. ईटलीकडून बेन मॅनेंटी आणि क्रिशन कालुगामेगे यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. मॅनेंटीने ४ षटकात ९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तसेच क्रिशनने ४ षटकात १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
ईटलीने सुरूवातच चांगली केली. पहिल्या षटकापासून मोठ-मोठे शॉट्स खेळत संघाला लवकर विजय मिळवून दिला. त्यांच्याकडून जस्टीन मोस्का आणि ऍंथोनी मोस्का यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाचा विजय सोपा केला. जस्टीनने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ६० धावा आणि ऍंथोनीने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारासह ६२ धावा केल्या. यावेळी नेपाळच्या सहा खेळाडूंनी गोलंदाजी केली, मात्र एकही जण ईटलीची सलामीजोडी तोडू शकला नाही.
ईटलीचा हा पहिलाच टी२० विश्वचषक आहे. यामुळे ते पहिल्या विजयासाठी आसुसलेले होते. आज तो त्यांना मिळाला. तसेच ते एका विक्रमाच्या यादीत सामील झाले. पुरूषांच्या टी२० विश्वचषकात १० विकेट्सने सामना जिंकणारा ईटली दुसरा असोसिएट संघ ठरला आहे. याआधी ओमानने २०२१मध्ये पीएनजीविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
या स्पर्धेत नेपाळचा पुढील सामना १५ फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध तर ईटलीचा १६ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध आहे. नेपाळने सलग दोन सामने गमावल्याने त्यांचे स्पर्धेतील स्थान धोक्यात आले आहे. त्यांनी मागील इंग्लंडविरुद्धचा सामना केवळ ४ धावांनी गमावला होता.
Comments are closed.