अरोरांना पुन्हा कंत्राट मिळावे म्हणून तटकरे दादांना भेटले, रोहित पवार यांचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्ता मार्गे न जाता विमानानेच प्रवास करावा यासाठी 27 जानेवारी रोजी जाणीवपूर्वी विलंब घडवला गेला. या मुद्दय़ावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस-आमदार रोहित पवार अजूनही ठाम आहेत. नरेश अरोरा यांचे कंत्राट कायम रहावे यासाठी सुनील तटकरे दादांना भेटायला गेले होते असा अंदाज असल्याचे रोहित पवार आज म्हणाले. त्यावेळी चर्चा लांबल्यामुळेच उशीर झाला आणि दादांना नाइलाजास्तव विमान बुक करावे लागले, असे रोहित पवार म्हणाले. या सर्व प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी रोहित पवार नवी दिल्लीला गेले होते. परंतु शहा यांनी अधिवेशनात व्यस्त असल्याचे सांगितल्याने भेट होऊ शकली नाही. मात्र आपण त्यांना सविस्तर ई-मेल पाठवणार असल्याचे रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या वेळी त्यांनी नरेश अरोरा यांच्या पंत्राटाबाबतही भाष्य केले.

पक्षाचे राजकीय सल्लागार म्हणून नरेश अरोरा यांना अजित पवार यांनी काही नेत्यांच्या सांगण्यावरून कंत्राट दिले होते. अरोरांचे कोटय़वधींचे कंत्राट दादांना रद्द करायचे होते. पक्ष कन्सल्टन्सीवर चालत नाही, त्यांना फक्त सर्व्हेपुरते मर्यादित ठेवा, असे दादांचे मत होते. बारामतीमध्ये एका प्रसंगात दादांनी अरोरांच्या लोकांना झापलेही होते. मात्र पक्षातील काही नेते मंडळी अरोरांच्या बाजूने होते असे सांगत रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली होती. अरोरा यांच्या कन्सल्टन्सीने विमान विकत घेतल्याची बाब चर्चेत होती. कदाचित याच कारणावरून वाद झाला असावा, अशी शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली.

दादा चार महिन्यांपासून एकटे पडल्यासारखे दिसत होते

अजितदादा गेल्या चार महिन्यांपासूनच एकटे पडल्यासारखे दिसत होते. देशपातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे अनेक लोक त्यांच्यासोबत नव्हते. काही मोजकेच आमदार दादांसोबत होते. आजही तेच आमदार दादांच्या अपघाताबद्दल बोलत आहेत, असे रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रमोद हिंदुराव यांच्या दाव्याबाबत बोलताना सांगितले.

पायलट सुमित कुमार उड्डाणापूर्वी कुणाला भेटला त्याचीही चौकशी व्हावी

27 आणि 28 जानेवारी या दोन दिवसांत घडलेल्या घटनांचा सातत्याने उल्लेख करताना रोहित पवार यांनी आज एका नव्या बाबीकडेही लक्ष वेधले. या दोन दिवसांच्या काळात दादांच्या विमानाचे मुख्य पायलट सुमित कुमार हे कुणाकुणाला भेटले होते, कोणाच्या संपका&त होते त्याचाही तपास व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रवादीच्या एकीकरणाबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेणार

शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस एनडीएसोबत जाणार होती का? दोन्ही राष्ट्रवादीचे एकीकरण होणार का या प्रश्नावर आपण येत्या सोमवार किंवा मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ, असे रोहित पवार म्हणाले. एकीकरणाबाबत काय घडले, कुठे चर्चा झाली, विलीनीकरणावर कोण काय बोलले या सर्व गोष्टींवरील पडदा आपण दूर करू, असे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आला होता, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

अजित पवार यांना 27 जानेवारीला कारने बारामतीला रवाना होण्यापूर्वी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा फाईल संदर्भात फोन आला होता, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. अजितदादांच्या पक्षाचे उपाध्यक्ष व आमदार प्रमोद हिंदुराव यांनी आज दादांच्या शोकसभेमध्ये बोलताना तो नेता म्हणजे प्रफुल्ल पटेल होते, असे सांगितले. अजित पवार यांचा कारने बारामतीला जाण्याचा निर्णय झाला होता. सर्व बॅगाही त्यांनी गाडीमध्ये भरायला सांगितल्या होत्या. सर्व तयारी झाली असताना अचानक प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आला. काहीतरी फाईल क्लिअर करायची आहे, काम अडले आहे, असे ते दादांना म्हणाले. त्यानंतर दादांनी तातडीने मंत्रालयातून फाईल मागवली. पण ट्रफिकमुळे ती देवगिरी बंगल्यापर्यंत आणण्यास साडेसात वाजले. त्यामुळे दादांनी गाडीतून बॅगा बाहेर काढण्यास ड्रायव्हरला सांगितले आणि विमान बुक केले, असा दावा हिंदुराव यांनी केला. दादांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव हे कधीच दादांच्या शेजारी बसले नव्हते पण 28 जानेवारीला विमानात ते दादांच्या शेजारी होते आणि त्याचा फोटो काढून त्यांनी घरच्यांना पाठवला होता, असेही हिंदुराव म्हणाले.

म्हणून पटेलांकडे संशयाची सुई जातेय

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनीही रोहित पवार यांच्या आरोपांवर चौकशी करण्यात आली पाहिजे, अशी मागणी केली. बारामतीला गाडीने जाणाऱया अजित पवार यांना विदर्भातील एका नेत्याने फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी आग्रह धरल्यामुळे उशीर झाला, असा आरोप आहे. त्यात पटेल यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे यामागे नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे लोकांसमोर यावे म्हणून चौकशी झाली पाहिजे, असे पटोले म्हणाले.

आजी आजोबांसोबत विलीनीकरणाची चर्चा झाली होती

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आमची सगळी चर्चा दादासोबतच झाली होती. अनेक लोकांना ती माहितीही होती. पण, आता उणीदुणी कशाला काढायची? आता दादाच नाही राहिला. दादा असता तर खूप अशा गोष्टी झाल्या असत्या. रेवतीच्या लग्नाची घोषणाही दादानीच केली असती. पण, दुर्दैव आहे की, दादा आज आपल्यात नाहीत. पण दादाची जी अपूर्ण स्वप्ने आहेत ती आम्ही पूर्ण करू, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Comments are closed.