राफेल, हेलिकॉप्टर खरेदी करणार

संरक्षण खरेदी मंडळाकडून प्रस्तावाला संमती

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारताच्या वायुदलासाठी आणखी 114 राफेल युद्ध विमाने आणि भारतीय नौदलासाठी 6 पीआय-8 देखरेख हेलिकॉप्टर्स खरेदीच्या प्रस्तावाला भारताच्या संरक्षण खरेदी मंडळाने संमती दिली आहे. हा एकंदर व्यवहार 3 लाख 25 हजार कोटी रुपयांचा आहे. ही खरेदी झाल्यानंतर भारताच्या युद्धसामर्थ्यात मोलाची भर पडणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून गुरुवारी देण्यात आली आहे. संरक्षण खरेदी मंडळाची बैठक संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत या खरेदी प्रस्तावावर व्यापक विचारविमर्श करण्यात आला. भारतीय वायुदलाला युद्ध विमानांची अत्याधिक आवश्यकता आहे. भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शत्रूदेशांशी एकाचवेळी दोन हात करण्याची वेळ आली, तर युद्ध विमानांची संख्या पुरेशी असण्याची आवश्यकता आहे. भारताला युद्ध विमानांच्या किमान 42 स्क्वाड्रन्स आवश्यक आहे. सध्या वायुदलाकडे केवळ 29 स्क्वाड्रन्स आहेत. ही संख्या गेल्या कित्येक दशकांमधील सर्वात कमी आहे, अशी माहितही देण्यात आली आहे.

गेल्या महिन्यातही मान्यता

या खरेदीला गेल्या महिन्यात संरक्षण खरेदी कक्षाकडून मान्य करण्यात आला होता. आता मंडळाने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेकरीता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या समितीने मान्यता दिल्यानंतर खरेदीच्या प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे. ही खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय वायुदलाकडे 150 राफेल विमाने असतील. तसेच, भारतीय नौदलाकडेही 26 कॅरिअर कंपॅटिबल राफेल विमानांचा संच निर्माण होणार आहे.

‘सिंदूर’ अभियानात सरस

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात चालविलेल्या ‘सिंदूर अभियाना’त राफेल विमानांची अजोड कामगिरी केली होती. या अभियानाच्या यशाचा खरा मानकरी राफेल विमानच होते, असे प्रतिपादन नुकतेच वायुदलउपप्रमुख एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्पष्ट केले आहे.

P-8A हेलिकॉप्टरचे महत्त्व

भारतीय नौदलासाठी पी- 8 आय हेलिकॉप्टर्सचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारत अशी सहा हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून विकत घेणार आहे. ही हेलिकॉप्टर्स भारताच्या सागरी क्षेत्राच्या देखरेखीसाठी अत्यंत महत्वाची आहेत. शत्रूच्या पाणबुड्यांचा अचूक शोध घेऊन त्यांना नष्ट करण्याची या हेलिकॉप्टर्सची क्षमता आहे. सध्या नौदलाकडे 12 पी-8 आय हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांनी आतापर्यंत 40 हजार तासांची सुरळीत उ•ाणे केली आहेत, अशी माहिती आहे.

संरक्षणावर वाढीव खर्च

नुकताच भारताचा पुढच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यात संरक्षणासाठी 7 लाख 80 हजार कोटी रुपयांची तरतूद संरक्षणासाठी केलेली आहे. येत्या काही वर्षांमध्ये भारत मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मिती करणार असून या शस्त्रांमध्ये स्वदेशनिर्मित आणि विदेशी अशा दोन्ही शस्त्रांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणावरही भर दिला जाईल.

अनेक विमाने भारतात तयार होणार

फ्रान्सकडून भारत घेणार असलेल्या 114 राफेल विमानांच्यापैकी 26 विमाने सज्ज स्थितीत मिळणार आहेत. तर उरलेली विमाने भारतात जोडली जाणार आहेत. भारतात जोडल्या जाणाऱ्या विमानांमध्ये 60 टक्के भाग भारत निर्मित असतील. आणखी काही काळानंतर भारताला या विमानांचे तंत्रज्ञानही हस्तांतरीत केले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय आणि संरक्षण वर्तुळात करण्यात येत आहे. राफेल विमानांच्या खरेदीनंतर भारताची वायुशक्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

वाढणार सामर्थ्य

  • येत्या पाच वर्षांमध्ये राफेल विमानांचा करार पूर्ण होण्याची शक्यता
  • वायुदलाकडे सध्या 29 स्क्वाड्रन्स, एकंदर 42 स्क्वाड्रन्स आवश्यक
  • ‘सिंदूर अभियाना’त राफेल विमानाची भूमिका होती अत्यंत महत्वाची

Comments are closed.