करारातील बदल हे सहकार्याचे प्रतीक आहे

भारत-अमेरिका व्यापार करारावर भारताचे वक्तव्य

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार कराराच्या प्रारुपात भारताला सोयीचे होईल, असे परिवर्तन अमेरिकेने केले आहे. हे दोन्ही देशांमधील सहकार्याचे प्रतीक आहे. अमेरिकेने भारताची भूमिका समजून घेतली आहे, हे यातून स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 11 फेब्रुवारीला या करारात काही महत्वाचे परिवर्तन केल्याची घोषणा केली. व्यापार कराराच्या या सुधारित प्रारुपातून डाळी, कृषी उत्पादने, डिजिलट सेवा कर आणि 5 वर्षांमध्ये भारताकडून अमेरिकेच्या 500 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची खरेदी अशा अटी काढून टाकण्यात आल्या आहेत. भारताची नेमकी हीच भूमिका होती. या परिवर्तनामुळे भारताच्या कृषीक्षेत्राचे योग्य प्रकारे संरक्षण होणार आहे.

परराष्ट्र विभागाची प्रतिक्रिया

गुरुवारी भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाची नेहमीप्रमाणे साप्ताहिक पत्रकार परिषद झाली. या परिषदेत भारत-अमेरिका व्यापार करारासंबंधी आणि या कराराला काही जणांनी घेतलेल्या आक्षेपांसंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या प्रश्नांना उत्तरे दिली. सध्या दोन्ही देशांनी केवळ या कराराच्या चौकटीची माहिती दिली आहे. मुख्य करार मार्चच्या मध्यात होणार आहे. तो करार, सध्या जे प्रारुप प्रसिद्ध करण्यात आले आहे, त्याच्यावर आधारित असेल. सर्व मुद्द्यांना अंतिम स्वरुप लवकरच देण्यात येईल. त्यानंतर करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या होतील. ही प्रक्रिया येत्या काही आठवड्यांमध्ये पूर्ण केली जाईल. त्यानंतर करारातील प्रत्येक तरतुदींचे स्वरुप स्पष्ट होईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी स्वत:हून या कराराच्या मूळ स्वरुपात जे परिवर्तन केले, त्यातून अमेरिकेने भारताची बाजू समजून घेतली आहे, हे स्पष्ट होत आहे. दोन्ही देशांमधील सहसमजूतदारपणा यातून स्पष्ट होतो, अशी प्रतिक्रिया रणधीर जयस्वाल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली आहे.

अंतिम करार लवकरच

आता दोन्ही देश नव्या प्रारुपाच्या आधारे करारातील प्रत्येक तरतुदीला अंतिम स्वरुप देण्याची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. हे कार्य त्वरित करण्यास दोन्ही देश सज्ज आहेत. त्यामुळे हा करार लवकरात लवकर अस्तित्वात येईल. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारवृद्धीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. दोन्ही देश अधिक सहकार्यासाठी उत्सुक आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Comments are closed.