सेंट जोसेफ स्कूलने मराठी शिक्षकांना नोकरीवरून काढले, लोधिवलीच्या शाळा प्रशासनाविरोधात संताप
खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील वादग्रस्त सेंट जोसेफ स्कूलचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.मुख्याध्यापिकेने मनमानी करत पाच मराठी शिक्षकांना तडकाफडकी नोकरीवरून काढले. कोणत्याही प्रकारची लेखी सूचना, पूर्वकल्पना, कारणे दाखवा नोटीस अथवा स्पष्टीकरणाची संधी न देता थेट नोकरीवरून कमी केल्याने शिक्षकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यामुळे शाळा प्रशासनाविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाचे नियम, सेवा अटी व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार कोणती ही कारवाई करताना संबंधित शिक्षकास पूर्वसूचना देणे, कारणे स्पष्ट करणे व आपली बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. मात्र ४ फेब्रुवारी रोजी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल लोधिवली येथील मुख्याध्यापिका व व्यवस्थापन समितीने कोणतीही पूर्वसूचना, लेखी मेमो किंवा चौकशी न करता अचानक पाच शिक्षकांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा असून मनमानी पद्धतीने कारवाई केल्यास शिक्षक वर्गात असंतोष निर्माण होतो तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. मात्र या कशाचेच भान न ठेवता सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल प्रशासनाने शिक्षकांना अन्यायकारक पद्धतीने नोकरीवरून काढले. या निर्णयाबाबत शिक्षकांनी मुख्याध्यापिकांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही स्पष्ट कारण दिले नाही. उलट तुम्हाला दोन महिने दिले आहेत, एप्रिलपासून येऊ नका असे सांगून जिथे तक्रार करायची आहे तिथे करा अशी अरेरावी केली.
शिक्षकांना कामावरून काढल्याची बाब अत्यंत अन्यायकारक, नियमबाह्य व शिक्षकांच्या नैसर्गिक न्यायहक्कांना बाधा आणणारी आहे. शिक्षकांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देत मनमानी कारभार करणाऱ्या अन्यायग्रस्त मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अन्यायकारक वागणूक; मानसिक त्रास
शाळेच्या व्यवस्थापन समितीचा कारभार मनमानी स्वरूपाचा असून मराठी शिक्षक वर्गाला कमी लेखून अन्यायकारक वागणूक दिली जाते. वेळोवेळी मानसिक त्रास दिला जात आहे, आम्हाला कधीही जॉइनिंग लेटर किंवा कन्फर्मेशन लेटर देण्यात आलेले नाही. गेली तीन वर्षे आम्ही प्रामाणिकपणे सेवा बजावत असून अचानक सेवेतून काढणे हा अन्यायकारक निर्णय आहे, असे मत शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.