T20 WC26: नामिबियाविरुद्ध पांड्याची अष्टपैलू कामगिरी, दहा वर्षानंतर विराटच्या ‘त्या’ खास विक्रमाची हार्दिकने केली बरोबरी

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. गुरूवारी (१२ फेब्रुवारी) दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या नामिबियाविरुद्धचा सामना गतविजेत्या भारताने ९३ धावांनी जिंकला. भारतासाठी नेहमीच उत्तम कामगिरी करणाऱ्या एका खेळाडूवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात, तो आहे स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या. दोन वर्षाआधीही त्याने चांगले प्रदर्शन करत संघाला विजेतेपद जिंकून देण्यात मोठी भुमिका बजावली होती. आता पुन्हा एकदा त्याने चांगल्या कामगिरीने सुरूवात करण्याचा प्रयत्न केला आहे.

या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर हार्दिकने दुसऱ्या सामन्यात त्याची भरपाई केली. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार तोच ठरला. आधी त्याने फलंदाजीत कमाल केली, नंतर गोलंदाजीतही धमाका केला.

या स्पर्धेत हार्दिक यूएसएविरुद्धच्या सामन्यात केवळ ५ धावा करत बाद झाला. गोलंदाजीतही काही खास कामगिरी केली नव्हती. ४ षटके टाकताना एकही विकेट न घेता ३४ धावा दिल्या होत्या. आताच्या सामन्यात मात्र त्याने अष्टपैलू खेळी केली. फलंदाजी करताना २८ चेंडूत ५२ धावा केल्या, ज्यामध्ये ४ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. गोलंदाजी करताना तर त्याच्याकडे हॅट्ट्रीक करण्याची संधी होती, मात्र ती त्याने गमावली. त्याने नामिबियाविरुद्ध ४ षटके टाकतान २१ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

हार्दिकच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला ‘प्लेयर ऑफ दी मॅच’चा पुरस्कार मिळाला. तसेच त्याने माजी कर्णधार विराट कोहलीच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. टी२० विश्वचषकाच्या एका सामन्यात अर्धशतक आणि विकेट घेण्याची कामगिरी दोन वेळा हार्दिकने केली असून तो असे करणारा दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने २०२४मध्ये बांग्लादेशविरुद्ध नाबाद ५० धावा करताना एक विकेटही घेतली होती.

विराटने २०१२च्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ७८ धावा करताना एक विकेट घेतली होती. तसेच त्याने २०१६मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाबाद ८९ धावा केल्या आणि एक विकेट घेतली होती. याच विक्रमाची हार्दिकने बरोबरी केली आहे.

Comments are closed.