पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे तापणार; मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण, काही ठिकाणी ढगाळ स्थिती राहणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यासह देशभरात कमाल तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवत आहे. मुंबई आणि ठाण्यात उकाड्यासह आर्द्रताही वाढत असल्याने घामाच्या धारा निघत आहे. राज्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीच कोरडे वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. मात्र, आता अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात काही भागत ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिना सुरू झाल्यावर उन्हाच्या झळांनी वातावरण तापत आहे. तसेच हे वर्ष तापमानवाढीचे असल्याने यावर्षी उकाडा जास्तच जाणवणार आहे. आता राज्यात काही ठिकाणी सकाळी थोडा गारवा असला तरी सूर्य डोक्यावर आल्यावर तापमानाचा पारा चढतो. आता राज्याच्या वातावरणात वेगान बदल दिसून येत आहेत. मुंबई आणि ठाण्यात पुढील दोन दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सतत येणाऱ्या वेस्टर्न डिस्टरबेंसमुळे देशासह राज्याचे हवामान बदलत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडं वातावरण असलं तरी येत्या काही तासांत राज्यात हलक्या पावसाच्या सरींचे आगमन होऊ शकते. येत्या 17-18 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याच्याच परिणामामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. मोठा, मुसळधार पाऊस पडणार नसला तरी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. त्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देशात पारा काहीसा घसरलेला दिसला. आखणी काही दिवस हीच स्थिती कायम राहू शकते. राज्यात इतर भागात मागील चार दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. वातावरणात जाणवणारी थंडी, गारवा गायब झाला असून उन्हाळ्याची चाहूल लागण्यात सुरुवात आहे. उष्यामध्ये वाढ झाली असून रात्रीही काही प्रमाणात उकाडा जाणवतोय. कमाल व किमान तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना रात्री जाणवणारा गारठासुद्धा आता कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Comments are closed.