कश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स झाल्या आता मोदींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना एपस्टीन फाईल्स दाखवाव्या; संजय राऊत यांचा सणसणीत टोला
एपस्टीन फाईल्समध्ये मुख्य भूमिका मोदी व भाजपची आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगावे की, मित्रों, जाऊन एपस्टीन फाईल्स बघा; असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला लगावला आहे.
”मोदी नेहमी म्हणतात ताश्कंद फाईल बघा,कश्मीर फाईल बघा केरळ फाईल बघा. स्वत: जाऊन सिनेमा बघायला बसतात. आता मोदींनी त्यांच्या लोकांना सांगायला पाहिजे की एपस्टीन फाईल बघा. यात मुख्य भूमिकाच त्यांचीच आहे. भाजपचीच मुख्य भूमिका आहे त्यात. मोदींनी सांगायला पाहिजे की, मित्रों एपस्टीन फाईल भी देखो”, असे संजय राऊत म्हणाले.
”देशाच्या स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी राहुल गांधी लढत आहेत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहेत. देशात सामाजिक समरसता असावी, देश अमेरिकेचा गुलाम होऊ नये म्हणून राहुल गांधी लढत आहेत. हे जर भाजपने संसदेत आणलेल्या गुंडांना कळत नसेल तर त्यांनी अमेरिकेत जाऊन ट्रम्पची भांडी घासावी. राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं ती सगळ्यांचीच भावना आहे. जे ट्रेड डिल अमेरिकेसोबत झाले आहे. त्यात भारताचा शेतकरी, कष्टकरी गुलाम झालेयत. देश गुलाम झालाय. ट्रम्प यांच्या दबावाखाली आपण रशियाकडून तेल खरेदी थांबवली. त्यामुळे देशाचं ९० हजार बिलीयन डॉलर नुकसान होतंय. ही गुलामी नाही का? या गुलामी विरोधात जर कुणी बोलत असेल तर त्यांना संसदेत येण्यापासून आजन्म रोखा असं जे बोलतात ते भंपक लोकं आहेत. वीर सावरकरांना स्वातंत्र्यासाठी दोन जन्मठेप झाली आहेत ना. राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढतील. बाकी काय. ते गेले तर आम्ही सगळे बाहेर पडू. बसा एकटे लोकसभेत. पण हा निर्णय होईपर्यंत मोदींचं सरकार राहिल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
”मोदी सरकारने गुंडांची फौज संसदेत भरली आहे. राहुल गांधी देशाचे नेते आहेत, विरोधी पक्षनेते आहेत. देशाच्या लोकशाहीसाठी लढत आहेत. देशात जी गुलामी येत आहे. त्यासाठी लढत आहेत. मोदीजींनी जी ट्रेड डिल केलीय त्याचा स्वीकार ज्यांना करायचे आहे त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन लादी पुसा. जर हे लोकं राहुल गांधीना फासावर लटवकत असतील तर आम्ही सर्व व देश त्यांच्यासोबत आहोत. कारण आम्हाला देशाला प्रेसिडंट ट्रम्पला विकायचे नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
मंत्रालयात एका कारकूनाला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”सन्माननीय, आदरणीय नरहरी झिरवळ औषध व प्रशासन मंत्रालय. त्यांना त्यातलं काय कळतं ते माहित नाही. पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. कुठले ट्रक सोडा, कंटेनर सोडा, असे सगळ्याप्रकारचे कार्यक्रम तिथे चालतात. पकडलेले फार किरकोळ लोकं आहेत. लाच प्रतिबंधक विभागाने त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे”.
Comments are closed.