4 फलंदाजांची नावे घेत सूर्यकुमारने दिला पाकिस्तानला इशारा, नामिबियाला हरवल्यानंतर मोठं वक्तव्य

सूर्यकुमार यादव: 2026 च्या टी-20 विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नामिबियाला 93 धावांनी हरवून स्पर्धेत आपला विजयी प्रवास सुरू ठेवला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या शानदार विजयानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने संघाच्या कामगिरीबद्दल, विशेषतः इशान किशनच्या फलंदाजीबद्दल आणि जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला. सूर्याने विजयाचे श्रेय फलंदाजांना देत म्हटले, की ही फलंदाजी करणे सोपी विकेट नव्हती, परंतु इशान आणि संजूने ज्या पद्धतीने सुरुवात केली, ती खूप सोपी खेळपट्टी वाटली. सुरुवातीच्या दोन-तीन विकेट पडल्यानंतर, शिवम आणि हार्दिक यांच्यातील भागीदारी कौतुकास्पद होती असे  सूर्यकुमार यादवने म्हटले आहे.

जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती आणि वरुण चक्रवर्तीची फिरकीचं कौतुक

सूर्यकुमारने नामिबियाच्या गोलंदाजांचे देखील कौतुक केले. त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली आणि ते संपूर्ण नियोजनासह बाहेर आले. आमच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे आम्ही शेवटी चांगला खेळ केल्याचे सूर्यकुमारने सांगितले. भारतीय कर्णधारासाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती आणि वरुण चक्रवर्तीची फिरकी. बुमराहच्या पुनरागमनाबद्दल सूर्या म्हणाला, “बुमराहला त्याचा चार षटके पूर्ण टाकताना पाहणे हा आमच्यासाठी एक मोठा प्लस पॉइंट आहे. तो संघात परतला आहे आणि तो पुढील सामन्यासाठी (पाकिस्तानविरुद्ध) पूर्णपणे तयार असल्याचे सूर्यकुमारने सांगितले.

हार्दिक पांड्याचेही कौतुक झाले

सूर्यकुमार यादवने हार्दिक पंड्याच्या कामगिरीबद्दल आणि पुढील आव्हानांबद्दल बोलताना म्हटले, “प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही थोडी संथ सुरुवात केली, पण आता मला वाटते की आम्ही योग्य मार्गावर आहोत. आज हार्दिकने सामनावीराचा दर्जा मिळवून दिलेला हा संघासाठी मोठा उत्साह आहे.

गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी टी-20 वर्ल्डकप 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळाले. ग्रुप अ मध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत पाकिस्तानला मागे टाकले आहे. ग्रुप ब मध्ये श्रीलंका अव्वल स्थानावर आहे, तर ग्रुप सी मध्ये इंग्लंडची घसरण होऊन ते चौथ्या स्थानावर आले आहेत. ग्रुप ‘ड’मध्ये न्यूझीलंडने पहिला क्रमांक कायम राखला आहे. चारही गटांमधून एकूण 6 संघ सुपर 8 च्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. ग्रुप स्टेजमध्ये आतापर्यंत 6 संघांनी किमान दोन सामने गमावले आहेत. ग्रुप अ मधून यूएसए आणि नामिबिया, ग्रुप ब मधून आयर्लंड आणि ओमान, ग्रुप क मधून नेपाळ आणि ग्रुप ड मधून अफगाणिस्तान बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. या संघांनी प्रत्येकी दोन सामने गमावले असल्यामुळे त्यांचे सुपर 8 मध्ये पोहोचण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. कारण दोन विजय आणि दोन पराभव असलेल्या संघांना यावेळी सुपर 8 मध्ये स्थान मिळणे कठीण आहे.

आणखी वाचा

Comments are closed.