कोकणात दाखल झाले ओले काजूगर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोकणातील हापूस आंबा व काजू जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात पाठवले जातात. सध्या सुक्या काजूपेक्षा ओल्या काजूगराला बाजारात अधिक मागणी असून ओले काजूगर विक्रीसाठी संगमेश्वर बाजारपेठेत दाखल झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमेश्वर बाजारपेठेत कैऱ्या व काजू बिया विक्रीसाठी दाखल झाल्या असून ग्राहकांकडून त्यांना चांगली पसंती मिळत आहे. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे शेतकरी व बागायतदार वर्ग त्रस्त झाला आहे. सुरुवातीला आलेला मोहर अवकाळी पावसामुळे काळवंडला असला तरी शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेत बागायतीचे रक्षण केले.

सध्या बागांमध्ये तयार झालेल्या कैऱ्या व काजूगर विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. मात्र उत्पादन घटल्याने कैरी व काजूगराचे दर वाढले आहेत. बाजारपेठेत ओली काजू बी प्रतिकिलो सुमारे २५० रुपये तर ओला काजूगर प्रतिकिलो सुमारे १२०० रुपयांनी विक्री होत आहे.संगमेश्वर बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या काजू व कैरीमुळे बाजारात ग्राहक मोठया प्रमाणात खरेदी करताना दिसत असून बचत गटातील महिलांनी काजूगर प्रक्रिया, पॅकिंग व थेट विक्रीसाठी पुढाकार घेतल्यास त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Comments are closed.