IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार जाहीर! यशस्वीकडे दुर्लक्ष, ‘या’ खेळाडूकडे नेतृत्वपद

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) २०२६च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने नव्या कर्णधाराची शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) घोषणा केली. रियान पराग हा राजस्थानचे येत्या आयपीएल हंगामात नेतृत्व करणार आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जमध्ये गेल्याने फ्रॅंचायजीने २४ वर्षीय फलंदाजावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

राजस्थानकडे रियान व्यतिरिक्त कोणताच चांगला पर्याय उपलब्ध नव्हता. संघाकडे रविंद्र जडेजा आणि यशस्वी जायसवाल आहे, मात्र संघ व्यवस्थापकांनी भविष्याचा विचार करता रियानवर विश्वास दाखवला आहे. रियानने २०१९मध्ये राजस्थानकडून आयपीएल पदार्पण केले होते. यामुळे तो आयपीएलच्या सातही हंगामात राजस्थानकडूनच खेळला. यामध्ये त्याने ८४ सामने खेळले आणि त्यामध्ये १५६६ धावा केल्या. त्यात सात अर्धशतकांचाही समावेश आहे.

मागील वर्षी जेव्हा सॅमसन दुखापतीमुळे बाहेर होता, तेव्हा रियाननेच कर्णधारपद सांभाळले होते. त्याच्या नेतृत्वात राजस्थान केवळ दोन सामने जिंकले आणि सहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे २०२५च्या आयपीएल गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर राहिले. रियानने मात्र फलंदाजीने उत्तम कामगिरी केली. त्याने १४ सामन्यात ३९३ धावा केल्या. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ९५ धावांची खेळी केली होती.

नव्या कर्णधारासाठी मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी नव्या खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या. अंतिम निर्णयामध्ये रियानच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Comments are closed.