IND vs PAK: सलग 2 सामने बेंचवर; आता पाकिस्तानविरुद्ध या मॅचविनरला संधी मिळणार? प्रशिक्षकांचं मोठं विधान!

15 फेब्रुवारी रोजी आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि (india vs Pakistan) पाकिस्तान यांच्यात ‘ग्रुप ए’ मधील हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित असून त्यांनी ‘सुपर 8’ मधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. अशा परिस्थितीत, कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना (Spinners) मदत करू शकते, हे लक्षात घेता भारतीय संघ व्यवस्थापन कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकते. कदाचित अर्शदीप सिंगच्या (Arshdeep singh) जागी त्याला संघात स्थान मिळू शकते.

कुलदीपचे लहानपणाचे प्रशिक्षक कपिल देव पांडे (Kapil Dev Pande) यांनी या बदलाचे जोरदार समर्थन केले आहे. त्यांनी ‘रेवस्पोर्ट्स’शी बोलताना सांगितले की, कुलदीपला पाकिस्तानविरुद्ध नक्कीच खेळायला हवे. त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. यासाठी कुणा एकाला संघातून बाहेर बसावे लागेल, पण कुलदीपने स्वतःला पाकिस्तानविरुद्ध सिद्ध केले आहे.

कुलदीप यादवने सातत्याने पाकिस्तानी फलंदाजांना अडचणीत आणले आहे. विशेषतः 2025 च्या आशिया कप फायनलमध्ये त्याने 30 धावांत 4 बळी घेतले होते आणि संपूर्ण स्पर्धेत 17 विकेट्स घेतल्या होत्या. सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षक पांडे यांनी कुलदीपला एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही याचा विचार न करता नेटमध्ये सराव सुरू ठेवण्यास सांगितले. जर पाकिस्तानी फलंदाजांनी कुलदीपवर उगाच दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर ती त्यांची मोठी चूक ठरेल. कुलदीप एक ‘विकेट टेकर’ गोलंदाज आहे आणि तो विकेट घेणारच. प्रशिक्षकांनी भारतीय फलंदाजांना पाकिस्तानचा गोलंदाज उस्मान तारिक याच्या संशयास्पद गोलंदाजी ॲक्शनबाबत सावध राहण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास अंपायरलाही याबद्दल सावध करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. शेवटी, टीम इंडियाच हा सामना जिंकेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments are closed.