IND vs PAK: भारत-पाक कोलंबोत 14 वर्षांनंतर पुन्हा आमनेसामने! टीम इंडियाचा रेकॉर्ड पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरणारा

टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) च्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यापासून सर्वांचे डोळे 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याकडे लागले आहेत. दोन्ही संघांनी स्पर्धेत दमदार सुरुवात केली असून, भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने एकतर्फी जिंकले आहेत. तर दुसरीकडे सलमान आगाच्या (Salman Ali Agha) नेतृत्वाखालील पाकिस्ताननेही आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. आता या महामुकाबल्यात जो जिंकेल, त्याचे सुपर-8 मधील स्थान पक्के होईल.

टी-20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान कोलंबोच्या या मैदानावर दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत.

याआधी 2012 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हे दोन संघ येथे आमनेसामने आले होते. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली भारताने प्रथम गोलंदाजी निवडली होती. लक्ष्मीपती बालाजी (3 विकेट्स), अश्विन आणि युवराज (प्रत्येकी 2 विकेट्स) यांच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव 128 धावांत आटोपला होता. भारताने 129 धावांचे लक्ष्य अवघ्या 17 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले. विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 78 धावांची शानदार खेळी केली होती, तर सेहवागने 29 आणि युवराजने नाबाद 19 धावांचे योगदान दिले होते.

आर. प्रेमदासा स्टेडियमच्या या मैदानावर भारतीय संघाची आकडेवारी पाहता, पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा आहे. भारताने या मैदानावर एकूण 15 सामन्यात 11 विजय मिळवले आहेत तर, 4 पराभव पत्करले आहेत. विशेष म्हणजे, या मैदानावर पाकिस्तानने भारताला कधीही टी-20 मध्ये हरवलेले नाही. भारताचा विजयाचा हाच सिलसिला 15 फेब्रुवारीला कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.