झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियाविजय हिंदुस्थानला पावणार? खळबळजनक विजयाचा योगायोग जुळून आल्यास हिंदुस्थानची जगज्जेतेपदाची हॅटट्रिक
झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवलेले खळबळजनक विजय हिंदुस्थानी संघासाठी सलग दोनदा भाग्यशाली ठरलेत. तो योगायोग पुन्हा जुळून आला तर हिंदुस्थान जगज्जेतेपदाची हॅटट्रिक साकारू शकतो. म्हणजेच झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियाविजय हिंदुस्थानला पावणार का याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे.
१७ तारखेला झिम्बाब्वे सुपर एटमध्ये
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिला धक्कादायक निकाल कोलंबोमध्ये पाहायला मिळाला. झिम्बाब्वेने बलाढय़ ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत करत ‘ब’ गटातील स्पर्धेला नवे वळण दिले. या वळणामुळे कोणता संघ सुपर एटची पायरी चढेल हे पुणी सांगू शकत नसला तरी या पायरीवर झिम्बाब्वेने आपली पावले ठेवली आहेत. त्यांच्या पावलांमुळे ऑस्ट्रेलियावर सुपर-8च्या शर्यतीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आली आहे. आता त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नाही. एक पराभवही त्यांचे आव्हान संपुष्टात आणू शकतो. ‘ब’ गटात कोणता संघ सुपर एट गाठणार याचा फैसला 16 फेब्रुवारीला पॅण्डीत होणाऱया ऑस्ट्रेलिया-श्रीलंका लढतीतच लागेल. त्यानंतर झिम्बाब्वेला 17 तारखेला आयर्लंडविरुद्ध लढतीत विजय मिळवत सुपर एटमध्ये आपले नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी आहे. तसे पाहाता आयर्लंडही चांगला संघ आहे.
इतिहास साक्षी आहे..
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेचा विजयाला इतिहास साक्ष आहे. जेव्हा ते जिंकलेत, हिंदुस्थान जगज्जेता ठरला आहे. 2007 मध्ये त्यांनी कांगारूंना पाच विकेट्सने नमवले होते आणि आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती केली. दोन्ही संघांमध्ये एपूण चार सामने झाले असून प्रत्येकी दोन विजय मिळाले आहेत; मात्र विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेवर मात करता आलेली नाही. 2007 मध्ये झिम्बाब्वेच्या विजयानंतर महेंद्रसिंग धोनीचा संघ जिंकला होता.
त्याआधी हा योगायोग जुळून आला होता. 1983 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून खळबळ माजवली होती. याच स्पर्धेत कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने विश्वविजेतेपद पटकावले. 2007 च्या टी-20 विश्वचषकातही झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धक्का दिला आणि अखेरीस हिंदुस्थानने पाकिस्तानला हरवत जेतेपद मिळवले. या दोन्ही स्पर्धांत कपिल आणि धोनी पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत होते. यंदाही सूर्यकुमार यादव पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये संघाचे नेतृत्व करतोय. हा सनसनाटीपूर्ण विजय हिंदुस्थानसाठी नक्कीच शुभसंकेत घेऊन आलाय असे आपण मानू शकतो. कारण हा खेळ अनिश्चिततेचा आहे आणि इथे काहीही घडू शकते.
Comments are closed.