व्यापार कराराच्या विरोधात मोठ्या आंदोलनाची तयारी

किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांची राहुल गांधींनी घेतली भेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि अमेरिकेदरम्यान अलिकडेच झालेल्या व्यापार करारावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी हे मोदी सरकारवर टीकेचा भडिमार करत आहेत. व्यापार करार शेतकऱ्यांची उपजीविका हिरावून घेईल आणि देशाच्या अन्नसुरक्षेला कमकुवत करणार असल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत. राहुल यांनी लोकसभेत व्यापार कराराला शेतकरीविरोधी संबोधिले होते. तर आता त्यांनी शुक्रवारी किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत याप्रकरणी मोठ्या आंदोलनाची तयारी चालविली आहे.

संसद भवन परिसरात राहुल यांनी देशभरातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची भेट घेत भारत-अमेरिका अंतरिम व्यापार कराराचा विरोध करण्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या आवश्यकतेसोबत शेतकरी आणि कृषीमजुरांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यावर चर्चा करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या बैठकीत व्यापार कराराला विरोध दर्शवित मका, सोयाबीन, कापूस, फळे आणि मेव्याचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी तीव्र चिंता व्यक्त केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

शेतकरी नेते आणि राहुल गांधी यांनी या व्यापार कराराला विरोध करणे आणि शेतकरी-कृषीमजुरांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी व्यापक स्तरावरील  राष्ट्रीय आंदोलनाच्या गरजेवर चर्चा केली असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.

राहुल गांधींना भेटणाऱ्या शेतकरी नेत्यांमध्ये अखिल भारतीय किसान काँग्रेसचे प्रमुख सुखपाल एस. खैरा, भारतीय किसान मजदूर यूनियन, हरियाणाचे अशोक बलहारा, बीकेयू क्रांतिकारीचे बलदेव एस. जीरा, प्रगतिशील किसान मोर्चाचे आर. नंदकुमार, बीकेयू शहीद भगत सिंहचे अमरजीत एस. मोहरी, किसान मजदूर मोर्चा-भारतचे गुरमनीत एस. मंगत आणि जेके जमीदारा फोरमचे हमीद मलीक सामील आहेत.

सरकारने माझ्या विरोधात कुठलेही पाऊल उचलले तरी मी शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभा राहणार आहे असे राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हटले होते. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेतकरीविरोधी आणि व्यापार कराराद्वारे देश विकण्याचा आरोप केला होता.

Comments are closed.