भिवंडीच्या खाडीत रेतीमाफियांवर छापा; दीड हजार ब्रास साठा जप्त
महसूल विभागाने भिवंडीतील रेतीमाफियांना जबरदस्त दणका दिला आहे. खाडीमध्ये बेकायदेशीरपणे रेतीचे उत्खनन सुरू असल्याचे समजताच विशेष पथकाने धाव घेऊन छापा टाकला. तसेच १ हजार ५२३ ब्रास रेतीसाठा जप्त केला असून पोकलेन मशीन व डंपरही ताब्यात घेतला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले असून भिवंडी तालुक्यातील खाडीमध्ये होणाऱ्या हालचालींवर वॉच ठेवण्यात येणार आहे.
काल्हेर येथील खाडीमध्ये चोरीछुपके रेतीचे उत्खनन सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. त्याची गंभीर दखल ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेऊन त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजात खोले यांच्या मार्गदर्शनाखाली खाडीकिनाऱ्यावर गुरुवारी धाड टाकली. खारबाव, काल्हेर, कोपर येथील महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारीही या कारवाईच्या वेळी उपस्थित होते.
महसूल खात्याने काल्हेरच्या खाडीकिनारी धाड टाकली असता तेथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे उत्खनन केलेला रेतीसाठा आढळून आला. तसेच वाहतूक करणारा डंपर व पोकलेन मशीनदेखील तिथे होते. रेतीसह अन्य साहित्य जप्त केले असून संबंधितांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढे बेकायदा रेती उत्खनन होऊ नये म्हणून माफियांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Comments are closed.