संसदेचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब

विरोधकांकडून हरदीप पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी : भाजपकडून राहुल गांधींवर आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 13 व्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पूर्ण दिवस चालले नाही. लोकसभेचे कामकाज सुमारे 10 मिनिटेच चालू शकले, तर राज्यसभेचे कामकाज दोन तासांपर्यंत चालले आहे. आता दोन्ही सभागृहांचे कामकाज 9 मार्चपासून सुरू होणार आहे. शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी ‘हरदीप पुरी राजीनामा द्या’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केल्याने सभागृह तहकूब करावे लागले होते.

तर दुपारी 12 वाजता लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर शिक्षण आणि कायदा मंत्रालयाशी निगडित काही विधेयके मांडली गेली. यानंतर सभागृहाचे संचालन करणाऱ्या संध्या राय यांनी लोकसभा 9 मार्चपर्यंत स्थगित केली. संसदेचे  अधिवेशन दोन टप्प्यांमध्ये होत असून पहिला टप्पा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत पार पडला आहे. तर दुसरा टप्पा 23 दिवसांच्या ब्रेकनंतर 9 मार्चपासून सुरू होणार असून तो 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

देशाच्या विभागणीचा कट

राहुल गांधी हे सत्ता मिळविण्यासाठी देशाच्या विभागणीचा कट रचत होते असा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शुक्रवारी केला. सोरोस, फोर्ड फौंडेशन आणि तुकडे-तुकडे गँगचे म्होरके राहुल गांधी हे सत्ता मिळविण्यासाठी देशात फूट पाडू पाहत असल्याचा आरोप करत मी लोकसभा अध्यक्षांकडे याप्रकरणी चर्चेची मागणी केली असल्याचा दावा दुबे यांनी केला.

राजद खासदारांची निदर्शने

राजदच्या खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच केंद्र सरकारला आरक्षण धोरणात अल्पसंख्याक आणि ओबीसींसाठी कोटा वाढविण्याची मागणी केली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागास वर्ग आणि अत्यंत मागास वर्गासाठी 65 टक्के आरक्षणाची मागणी राजदच्या खासदारांनी केली आहे.

 

Comments are closed.