आंबोली बॉईजने कोरले जेतेपदावर नाव
गेले दोन दिवस अंधेरी पश्चिमेचा क्रिकेटमय झाला होता. शिवसेनेचे विधानसभा संघटक संजय कदम यांच्या पुढाकाराने आयोजित ‘प्रसिद्ध कार्यसम्राट भव्य चषक 2026’ टेनिस क्रिकेट स्पर्धेत आंबोली बॉईजने बाजी मारली. त्यांनी कपासवाडी बॉईजचा पराभव करत आपले नाव जेतेपदावर कोरले.
डी. एन. नगरच्या महात्मा फुले क्रीडांगणात रंगलेल्या या स्पर्धेत अंधेरी व परिसरातील तब्बल 40 संघांनी सहभाग घेतला. दोन दिवसांच्या चुरशीच्या सामन्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. अंतिम लढतीत आंबोली बॉईज (शाखा 65) यांनी अचूक फलंदाजी व शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर कपासवाडी बॉईज (शाखा 68) संघावर मात करत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला रु. 50 हजार तर उपविजेत्यांना रु. 25 हजार रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी खेळातून शिस्त आणि एकजूट निर्माण होते. त्यामुळे अंधेरीत तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने अशा स्पर्धा आयोजित केल्या जातील, असे आश्वासन आयोजक संजय कदम यांनी दिले.
या दिमाखदार स्पर्धेच्या उद्घाटन व समारोप सोहळय़ास उपनेते अमोल कीर्तिकर, आमदार हारून खान, विभाग संघटिका अनिता बागवे, माजी नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.