FIH Pro League: अर्जेंटिनावर पुन्हा एकदा भारी पडला बेल्जियम! ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 3-0ने केले पराभूत

बिरसा मुंडा हॉकी स्टेडियममध्ये शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) एफआयएच प्रो लीगमध्ये बेल्जियम विरुद्ध अर्जेंटिना पुरुष संघाचा सामना खेळला गेला. यामध्ये बेल्जियमने अर्जेंटिनाला ५-२ असे पराभूत केले. आर्थर डी स्लोवरने आपल्या कारकिर्दीतील २००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना उत्तम कामगिरी केली. शेवटच्या ११व्या मिनिटांमध्ये सामना २-२ असा बरोबरीत असताना बेल्जियमने धमाकेदार कामगिरी करत तीन गोल केले आणि विजय मिळवला.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३-० असे पराभूत केले आहे. होबार्ट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ब्लेक गोवर्सने १४व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली. ३४व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर दुसरा गोल करत आघाडी पक्की केली. ४२व्या मिनिटाला जॅक वेल्चने नॅथन जिनरच्या असिस्टवर तिसरा गोल केला. पाकिस्तानचा गोलकीपर अली रजाने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसले.
या स्पर्धेच्या गुणतालिकेत बेल्जियम अव्वल स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत ७ सामने खेळले असून ६ जिंकले, तर एक अनिर्णीत राहिला. त्यांनी १० फेब्रुवारीला झालेल्या सामन्यातही अर्जेंटिनाला ५-३ असे पराभूत केले होते. यामध्ये भारताचे केवळ दोन सामने झाले असून ते दोन्ही गमावले आहेत. त्यामुळे ते आठव्या स्थानावर आहेत. पाकिस्तानने मात्र ७ सामने खेळताना सलग ७ सामने गमावल्याने ते गुणतालिकेच्या तळाशी आहेत.
भारताचा आज (शनिवार, १४ फेब्रुवारी) बेल्जियमशी सामना आहे. या स्पर्धेत हे दोन संघ आधीही समोरा-समोर आले होते. त्यामध्ये बेल्जियमने बाजी मारली होती. तो सामना भारताने १-३ असा गमावला होता. भारताने मागील सामन्यातही खूपच निराशाजनक कामगिरी केली होती. अर्जेटिंनाविरुद्धचा तो सामना भारताने ८-० असा गमावला होता. आता त्यांना स्पर्धेतील प्रत्येक सामन्यांत जिंकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
बेल्जियमची कामगिरी पाहता ते आजच्या सामन्यातही भारताला टक्कर देण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील आणि गुणतालिकेत अव्वल राहण्याच्या प्रयत्नात असतील.
Comments are closed.