खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप, 1 लाख डॉलर्सची सुपारी; हिंदुस्थानी नागरिकाने गुन्हा कबूल केला, किती वर्षांची शिक्षा होणार?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली हिंदुस्थानी नागरिक निखिल गुप्ता (वय – 54) याने मॅनहॅटनमधील फेडरल कोर्टात आपला गुन्हा कबूल केला आहे. अमेरिकन भूमीवर एका अमेरिकन नागरिकाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुप्ताला आता 40 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, निखिल गुप्ता याने हिंदुस्थानी सरकारच्या एका कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून पन्नूनच्या हत्येचा कट रचला होता. मे 2023 मध्ये विकास यादव नामक व्यक्तीने गुप्ताला या कामासाठी नियुक्त केले होते. गुप्ताने एका गुन्हेगाराशी संपर्क साधून 1 लाख डॉलर्समध्ये हत्येची सुपारी घेतली होती. मात्र, ज्याला गुप्ताने गुन्हेगार समजले होते, तो प्रत्यक्षात अमेरिकन अंमली पदार्थ विरोधी संस्थेचा (DEA) गुप्तचर होता. जून 2023 मध्ये या कामासाठी 15 हजार डॉलर्स आगाऊ देण्यात आले होते, परंतु अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा कट उधळला गेला.

निखिल गुप्ताने शुक्रवारी न्यायमूर्ती सारा नेटबर्न यांच्यासमोर तीन गुन्ह्यांची कबुली दिली. पहिला म्हणजे हत्येसाठी सुपारी घेणे, दुसरा म्हणजे हत्येचा कट रचणे आणि तिसरा मनी लाँड्रिंगचा कट रचणे. या गुन्ह्यांसाठी त्याला 29 मे रोजी न्यायाधीश व्हिक्टर मारेरो यांच्याकडून शिक्षा सुनावली जाईल. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, या प्रकरणावर बोलताना अमेरिकन अ‍ॅटर्नी जय क्लेटन म्हणाले, निखिल गुप्ताला वाटले होते की तो हिंदुस्थानबाहेर राहून अमेरिकन नागरिकाची हत्या करू शकेल, पण तो चुकला. अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही परकीय शक्तीला आम्ही सोडणार नाही. तर दुसरीकडे हिंदुस्थान सरकारने या कटाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या कारवाया करणे हे सरकारी धोरणाच्या विरोधात आहे, असे हिंदुस्थानने स्पष्ट केले. या प्रकरणाच्या तपासासाठी हिंदुस्थानने नोव्हेंबर 2023 मध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने जानेवारी 2025 मध्ये आपला अहवाल सादर केला असून, संबंधित व्यक्तीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगत कायदेशीर कारवाईची शिफारस केली आहे.

दरम्यान, पन्नून हा ‘शीख फॉर जस्टिस’ या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रमुख असून हिंदुस्थानी सरकारने 2020 मध्ये त्याला दहशतवादी घोषित केले आहे. तो वारंवार एअर इंडियाची विमाने उडवण्याच्या धमक्या आणि पंजाबमधील तरुणांना शस्त्रास्त्रे उचलण्यासाठी प्रवृत्त करणारे व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो. राष्ट्रीय तपास संस्थेने पंजाबमधील त्याची मालमत्ता आधीच जप्त केली आहे.

Comments are closed.