जागतिक क्रमवारीत 151 ते 1 चा प्रवास… आता चार वर्षानंतर ‘हा’ भारतीय खेळाडू घेणार पाकिस्तानविरुद्ध बदला!

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा अनेक चाहत्यांना आहे. रविवारी (१५ फेब्रुवारी) खेळला जाणारा हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांबरोबरच दोन्ही संघांचे खेळाडूही आतूर आहे. हा सामना भारताच्या एका खेळाडूसाठी महत्वाचा असणार आहे.
त्यासाठी भारतीय संघ कोलंबोमध्ये पोहोचला आहे. सलग दोन्ही सामने जिंकल्याने दोन्ही संघांमधील हा सामना चुरशीचा होईल. या स्पर्धेचा इतिहास पाहता मागील अनेक सामन्यामध्ये भारताचेच वर्चस्व राहिले आहे. तसेच या सामन्यात भारताचा एक खेळाडू बदला घेण्यासाठी उतरणार आहे. झाले असे की त्याने ४ वर्षांआधी पाकिस्तानविरुद्ध टी२० विश्वचषकाचा सामना खेळला होता, तेव्हा त्याची कारकिर्दच धोक्यात आली होती.
सध्या आयसीसी टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानावर आहे. त्याने मागील वर्षी झालेल्या आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करत अव्वल क्रमांक गाठला होता. तेव्हापासूनच तो या स्थानावर टिकून आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी२० विश्वचषक २०२१मध्ये खेळला होता. तेव्हा त्याने पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेत पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने एकही विकेट घेतली नव्हती. तेव्हा तो क्रमवारीत १५१व्या स्थानावर होता. यंदा मात्र पाकिस्तानला एका वेगळ्याच फिरकीपटूचा सामना करावा लागणार आहे.
वरुणच्या कारकिर्दीची सुरूवात २०२१मध्ये झाली आणि टी२० विश्वचषकात तो केवळ ३ सामन्यांच्या अनुभवासोबत खेळला होता. तेव्हा त्याने निराशाजनक कामगिरी केली आणि त्याला संघाबाहेर केले गेले. तेथेही ३ सामने खेळले आणि एकही विकेट घेतली नाही. नंतर त्याने हार न मानता आयपीएलमध्ये लागोपाठ चांगले प्रदर्शन केले आणि त्याची संघवापसी झाली. २०२४मध्ये तो संघात परतला, तेव्हापासून तो भारताच्या अनेक सामन्यांमध्ये महत्वाचा खेळाडू ठरला आहे.
वरुणने २०२४च्या टी२० विश्वचषकानंतर सर्वाधिक ६१ आंतरराष्ट्रीय टी२० विकेट्स घेतल्या. त्यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ७.३० असा होता. बाकी गोलंदाजांसोबत त्याची तुलना करता वरुणचा इकॉनॉमी रेट चांगला आहे. त्याने २०२४पासून खेळलेल्या सामन्यांमध्ये ७ ते १६ षटकांदरम्यान ८१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या स्पर्धेत दोन सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत.
Comments are closed.