भाजपच्या राज्यात माणसाच्या जीवाला किंमतच नाही, मेट्रोचा पिलर कोसळल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

मुंबईतील मुलुंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो-4 मार्गावरील पिलरचा एक भाग रिक्षा आणि कारवर पडला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज मेट्रो-4च्या सुरू असलेल्या कामातून पिलरचा एक मोठा भाग खाली पडून रिक्षा आणि कारचे नुकसान झाले. याआधीही नव्याने सुरू करण्यात आलेल्या मेट्रो-3 मार्गावर गेल्या वर्षी पावसाच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती, तसेच एका ठिकाणी भिंत कोसळल्याची घटना घडली होती.

या पार्श्वभूमीवर संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र असे होण्याची शक्यता कमी असून, काही लाखांचा दंड दाखवून त्याच कंत्राटदाराला पुन्हा कामे दिली जातील, अशी टीकाही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, काम पूर्ण होण्याआधीच मेट्रोच्या खांबांना रंग दिला जात आहे. त्यामुळे आधी रंगकामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आणि नंतर काम पूर्ण झाल्यावर पुन्हा तेवढाच खर्च करावा लागेल.

शहरातील बहुतांश पायाभूत कामांमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक ठिकाणी चुकीची बॅरिकेडिंग असल्याने वाहतूक कोंडी होते किंवा उघड्या खड्ड्यांत वाहने पडण्याच्या घटना घडतात, असे त्यांनी नमूद केले.

भाजप सरकारच्या कारभारात नागरिकांच्या जीवाला काहीच किंमत नसल्याची टीका करत, मेट्रोमधून पिलरचे भाग पडणे, असुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि उघड्या खड्ड्यांत वाहने पडण्याच्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला. अशीच परिस्थिती राहिली, तर भविष्यात इतर देश आपल्या देशाबाबत प्रवासाबाबत इशारे देतील, अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Comments are closed.