T20 WC26: लॉर्कन टकर-गॅरेथ डेलानीच्या वादळी खेळीने आयर्लंडचा मोठा विजय, ओमान स्पर्धेबाहेर!

भारत आणि श्रीलंका येथे सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या आवृत्तीत आजचा (शनिवार, १४ फेब्रुवारी) पहिला सामना ग्रुप बी मधील आयर्लंड विरुद्ध ओमान यांच्यात खेळला गेला. हा सामना आयर्लंडने ९६ धावांनी जिंकला आणि ओमान स्पर्धेबाहेर झाला आहे. स्पर्धेतील आयर्लंडचा हा पहिलाच विजय आहे, तर ओमानचा सलग तिसरा पराभव आहे. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार लॉर्कन टकरला मिळाला.
या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार जतिंदर सिंगचा हा निर्णय काही षटकानंतर चुकल्याचे लक्षात आले, कारण आयर्लंडचा कर्णधार-विकेटकीपर लॉर्कन टकर आणि गॅरेथ डेलानीचे वादळ आले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५६ चेंडूत १०१ धावांची भागीदारी केली.
गॅरेथ ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ५६ धावा करत बाद झाला. तेव्हा संघाची धावसंख्या १६.५ षटकात १६५ होती. त्यामुळे ओमानला वाटले आतातरी आयर्लंडच्या धावांचा वेग कमी होईल, मात्र जॉर्ज डॉकरेलने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. त्याने मोठे शॉट्स खेळले आणि संघाला इतिहास निर्माण करण्यात मदत केली. त्याने ९ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. त्यामुळे आयर्लंडने २० षटकात ५ विकेट्स गमावत २३५ धावसंख्या उभारली.
पुरूष टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही आयर्लंडची सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच या स्पर्धेच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. श्रीलंकेने २००७मध्ये केनियाविरुद्ध २६० धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात ओमनचा डाव १८ षटकात सर्वबाद १३९ धावसंख्येवरच संपुष्टात आला.
Comments are closed.