एका गुजराती गुंतवणुकदाराला फार्महाऊससाठी जमीन हवी म्हणून नार्वेकर शनिवार – रविवार अलिबागला असतात – संजय राऊत

अलिबागमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जमीनीच्या मोजणीसाठी गेले होते. तेव्हा काही ग्रामस्थांनी नार्वेकरांसोबत असलेल्या व्यक्तीला चोप दिला. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर पैश्यांच्या मोहापायी कोकणचे गुजरात करत आहेत अशी टीका केली. तसेच एका गुजराती गुंतवणुकदाराला फार्महाऊससाठी जमीन हवी म्हणून नार्वेकर शनिवार रविवारी अलिबागला असतात असेही संजय राऊत म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले की, कोकणातील या गुजराती लॉबीसाठी किती अथक प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल विभागावर विधानसभा अध्यक्ष म्हणून कसा दबाव आणला जात आहे, याची इत्यंभूत माहिती जर विधानसभा अध्यक्षांना हवी असेल, तर मी ती देण्यास तयार आहे. त्या व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. मात्र आमच्या मराठी माणसांच्या कोकणातील जमिनी अशा पद्धतीने हिसकावून घेणे, त्यांना फूस लावणे आणि जमिनी ताब्यात घेऊन त्या गुजराती लॉबीला विकणे, अलिबागचाही गुजरात करण्याचे उद्योग सुरू आहेत. त्याचा भडका या व्हिडिओमध्ये दिसेल.

एका शेताची मोजणी करण्यासाठी सरकारी अधिकारी घेऊन हे महाशय गेले होते. ती जमीन गुजरातमधील एका गुंतवणूकदाराला फार्महाऊससाठी हवी होती. त्याच्या नजरेत ती जागा भरली. पूर्वी जसे कुणाच्या नजरेत काही भरले की भाजपचे लोक म्हणायचे, “उचलून आणूया,” तसेच आता जमिनी उचलून ताब्यात घेतल्या जात आहेत असे संजय राऊत म्हणाले.

त्या जागेचे मालक घरात नसताना, त्यांच्या घरी लग्नसमारंभ सुरू होता. ते घरात नसल्याचे पाहून सरकारी अधिकारी विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तिथे घुसले आणि मोजणी सुरू केली. जमिनीच्या मालकांना ही बाब कळताच संपूर्ण कुटुंब तिथे पोहोचले. या व्हिडिओमध्ये ते अर्धवट दिसत असले, तरी सुरुवातीला त्या बिचाऱ्या माऊलीने कोणाच्या कानाखाली मारली, त्याचाही व्हिडिओ येईल. अधिकाऱ्यांवर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. “आमच्या जमिनी तुम्ही बेकायदेशीररीत्या हिसकावून देता,” असा त्यांचा आरोप आहे.

रायगड जिल्ह्यात हे प्रकार सुरू आहेत, सिंधुदुर्गातही प्रकरणे सुरू आहेत, रत्नागिरीतही असे प्रकार घडत आहेत, तसेच पालघर भागातही हे सुरू आहे. गुजरातमधील ही टोळधाड भाजपचे मराठी , सत्ताधारी मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष कोकणात आणत आहेत. कोकणाचे स्मशान करून त्याला गुजरात बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा भडका मातोळी गावात उडाला.

मी त्या कुटुंबाचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले की या राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची आणि सत्ताधाऱ्यांची पात्रता काय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण राज्याचे प्रमुख आहात. सामान्य जनतेच्या शेती, घर आणि संपत्तीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र आपल्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधानसभेचे अध्यक्ष अशा प्रकारे वागत असतील, तर ते चुकीचे आहे.

नार्वेकर भांडण सोडवण्यासाठी गेल्याचे खोटे बोलत आहेत. ते शनिवार-रविवारी तिकडेच जाऊन जमिनींची पाहणी करत असतात. त्यांचे आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत, पण ते कोकणात जे करत आहेत, कोकणाला पैशाच्या मोहात गुजरात बनवत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. अलिबागला जाऊन पाहा, तेथील मराठी माणूस मागे पडला आहे. रहेजा, लोढा, हिरानंदानी यांसारख्या अनेक बिल्डरांनी अलिबागसारख्या शांत, सुंदर गावाचा ताबा घेतला आहे. मातोळी गावातील घटना ही लोकांच्या भावनांचा उद्रेक आहे.

Comments are closed.