‘150 दिवस सेवाकर्मी’ अभियानात रत्नागिरी नगरपरिषद राज्यात अव्वल, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वात पैकीच्या पैकी गुण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘150 दिवस सेवाकर्मी’ अभियानांतर्गत प्रशासकीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेने 80 पैकी 80 गुण मिळवत नंबर वन पटकावला आहे.​राज्य शासनाने प्रशासकीय कामकाजातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आणि सुशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘150 दिवस सेवाकर्मी’ कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या अनेक भागांत उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे या कार्यक्रमाला 10 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या विस्तारित कालावधीत मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी अत्यंत नियोजित पद्धतीने नगरपालिकेचे कामकाज पूर्णत्वास नेले.

​या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात रत्नागिरी नगरपालिकेला 80 पैकी 80 असे 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पदभार स्वीकारल्यापासून नगरपालिकेतील आस्थापना विषयक सर्व बाबी अद्ययावत करण्यावर भर दिला. यामध्ये प्रामुख्याने सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, सरळ सेवा नियुक्ती आणि बिंदू नामावलीचे प्रमाणीकरण करून घेणे यांसारख्या तांत्रिक कामांचा समावेश होता. विशेष म्हणजे, प्रशासकीय संवेदनशीलतेचा परिचय देत त्यांनी 100 टक्के अनुकंपा नियुक्त्यांचे उद्दिष्टही यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

​प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी गारवे यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. केंद्राच्या ‘आयजीओटी’ (iGOT) ऑनलाइन प्रशिक्षण प्लॅटफॉर्मवर सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी करून घेऊन विहित कोर्सेस पूर्ण करून घेतले. तसेच, कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे आणि कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व निकषांवर रत्नागिरी नगरपरिषदेने अव्वल स्थान पटकावल्याने, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वैभव गारवे यांचा सत्कार होणार आहे. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कामकाजात सुसुत्रता आणून हे यश संपादन केले.

Comments are closed.