वेगळे देश, धर्म आणि वयावरून होणारी टीका त्रासदायक; घटस्फोटाच्या अफवांना प्रियांका चोप्राचे उत्तर
आपल्या अभिनयाने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमेरिकन गायक निक जोनस आणि प्रियांका यांच्या लग्नाला आता आठ वर्षे पूर्ण होत असताना, सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा वारंवार डोकं वर काढत असतात. या सर्व चर्चांवर आणि लोकांच्या टीकेवर प्रियांकाने ‘व्हरायटी’ला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत परखड शब्दांत आपले मत व्यक्त केले असून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
प्रियांका म्हणाली की, निक आणि तिचे नाते आजही अनेकांना खुपते आहे. आमच्या नात्याबद्दल लोकांना नेमका काय त्रास होतोय, हे मला अद्याप समजलेले नाही. आमचे वेगवेगळे देश, भिन्न धर्म आणि वयातील अंतर यावरून लोकांनी आजवर प्रचंड चर्चा केली आहे. या गोष्टींवर सतत होणारी टीका आणि चर्चा अत्यंत त्रासदायक असल्याचे प्रियांकाने यावेळी मान्य केले. आजही अनेक लोक हे नाते तुटण्याची वाट पाहत आहेत, हा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन असल्याचे तिने स्पष्ट केले.
घटस्फोटाच्या अफवांकडे ती आणि निक कसे पाहतात, यावर प्रियांकाने एक उत्तम उदाहरण दिले. तिने सांगितले की, बाहेर लोक आमच्याबद्दल काय बोलतात याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. या चर्चा एखाद्या बदकाच्या अंगावर पडणाऱ्या पाण्यासारख्या आहेत, जे लगेच ओघळून जाते. आम्ही दोघे जेव्हा एकत्र असतो, तेव्हा जगातील कोणत्याही नकारात्मकतेचा आमच्यावर परिणाम होत नाही.
या मुलाखतीदरम्यान प्रियांकाने पती निक जोनसचे तोंडभरून कौतुकही केले. मनोरंजन सृष्टीतील झगमगाटात अनेक माणसे बदलताना आपण पाहिली आहेत. मात्र, निक कोणत्याही परिस्थितीत बदलला नाही, असे प्रियांका चोप्राने अभिमानाने सांगितले.
Comments are closed.