नोंद – शिवरायांचा आठवावा प्रताप

>> रविप्रकाश काकर्णी

अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कुतूहल वाढतेच आहे. त्यामुळेच त्य्यांच्यासंदर्भात वेगवेगळे हिंदी, मराठी चित्रपट आलेले आपण पाहतो आहोत. याच्या बरोबरीनेच महाराज आणि त्यांचा काळ याबाबत मांडणी करणारी विविध लहान-मोठी पुस्तके आलेली दिसतात. सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील कादंबरी मालिकेतील तिसरी कादंबरी ‘अस्मान भरारी’चे प्रकाशन या संमेलनातच झाले (या अगोदरच्या दोन कादंबऱया म्हणजे ‘झंझावात’ आणि ‘महासम्राट, रणखैंदळ’) याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्त्वाची मोहिनी दिवसेंदिवस वाढतेच आहे. हे भारलेपण सर्वसामान्यांपासून ते अभ्यासकापर्यंत समान आहे.

रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप’ हे म्हणणे सार्थच म्हणायचे. विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला या प्रेमाला उधाण येते. नेमकेपणाने सांगायचे तर शालिवाहन शकाच्या 1551 या वर्षी, शुक्ल नाम संवत्सरात, उत्तरायणात, फाल्गुन महिन्यात, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूत, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभ क्षणी, अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाबाईसाहेब आईसाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला!

पण कालगतीप्रमाणे आम्ही आमची कालगणना सोडली, सोडावी लागलीदेखील असेल. इंग्रजांनी आमच्या सगळ्या आयुष्याची दिशा बदलून टाकल्याने त्यांची इंग्रजी कालगणना स्वीकारली. मग आम्ही शिवजन्माची तारीख 19 फेब्रुवारी, शुक्रवार, 1630 करून टाकली. त्यामुळे कोणी शिवजयंती तिथीप्रमाणे करतात तर काहीजण तारखेप्रमाणे. कुठल्याही प्रकारे असेना, शिवजयंती साजरी होते हे महत्त्वाचे. शेवटी स्मरण, श्रद्धेने केलेले स्मरण मोलाचेच असते. यानिमित्ताने काही नव्या गोष्टींकडे लक्ष वेधतो. अनुभव अक्षरधनतर्फे शिवकाल दर्शन दिनदर्शिका 2026 प्रकाशित झाली असून त्यामध्ये प्रत्येक तारखेला महाराजांनी काय केले वा काय घडले याची नोंद केली आहे. यासोबत युनेस्को मान्यताप्राप्त बारा किल्ल्यांची नकाशासहित माहिती आहे. शब्दप्रभू पब्लिकेशन, पाचोरा यांच्यातर्फे शिवप्रताप 2026 दैनंदिनी प्रकाशित झाली असून त्यामध्येदेखील प्रत्येक दिवशी महाराजांच्या आयुष्यात काय घडले याची नोंद केलेली आहे. शिवाय महाराजांचं एकूण आयुष्य अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं होतं. त्याचा पूर्ण ताळेबंद मांडलेला आहे. त्यापैकी विशेष एक हजार घटनांची नोंद तारखेनुसार येथे केली आहे. शिवाय युनेस्को मान्यताप्राप्त 12 किल्ल्यांची फोटोसहित माहिती, राजांच्या आज्ञापत्रातील काही विशेष भाग आहे. महाराजांच्या बाबतीत अशा प्रकारचा हा पहिलाच दस्तऐवज असावा.

थोर महापुरुषांचे स्मरण खरं तर केव्हाही करावं. पण आपण जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करतो, याचं कारण निदान वर्षातून एकदा तरी या आठवणींची आठवण राहावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना महाराजांचे कार्यकर्तृत्व सांगणारे कुठलेही पुस्तक वाचावे. अगदी ताजे पुस्तक प्रसाद तारेकृत ‘शिवछत्रपतींचे चित्रवैभव’ ज्यात जगातील महाराजांच्या विविध चित्रांचा धांडोळा घेतलेला आहे. अशा प्रकारचे दुसरे पुस्तक नाही. तसंच सुहास बहुलकर लिखित ‘कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या’ हा ग्रंथ एक नवी दृष्टी देईल. येणाऱया छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने केलेली ही नोंद ही जयंती डोळसपणे साजरी करण्यास उपयुक्त ठरावी.

Comments are closed.