रोखठोक – मूर्खपणाचा नवा आत्मविश्वास; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काय घडले?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप व त्याच्या मित्रपक्षांनी विजयाची हॅटट्रिक केली. विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावे असे हे निकाल आहेत. लढण्याची व जिंकण्याची भूक असावी लागते, ती संपली काय? फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो असे ज्यांना वाटते, त्यांनी या निवडणुकीत जिंकलेल्या `फाटक्या’ लोकांकडे पाहायला हवे!

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. शिवसेनेसह विरोधी पक्षांची पीछेहाट झाली व लातूरवगळता एकही जिल्हा परिषद विरोधी पक्षांना जिंकता आली नाही. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया योग्य आहे. ते म्हणतात, “विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती दिसत नाही.” इच्छाशक्तीचा अभाव हे विरोधी पक्षांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे, असे फडणवीस म्हणत असले तरी ते संपूर्ण खरे नाही. मुळात विरोधी पक्षाने निवडणुका लढूच नयेत अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे. निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार पळवायचे किंवा निवडून आल्यावर त्या लोकप्रतिनिधींना पैशाच्या जोरावर विकत घ्यायचे. त्यामुळे विरोधी पक्षाची पीछेहाट होत आहे व निवडणुका आता लढवायच्या कशाला? या मानसिकतेत सगळेच आले. जिल्हा परिषद निकालानंतर एका ज्येष्ठ नेत्याशी चर्चा झाली. ते म्हणाले, “भाजप आता 2029 च्या तयारीला लागलाय व त्या निवडणुकीचे बजेट आता तरी 25,000 कोटी इतके ठरलेय. ते वाढेलही. या खेळात फडणवीस विरोधकांच्या इच्छाशक्तीची परीक्षाच घेत आहेत. भाजप राज्यात व देशात सत्तेवर आहे. तरीही लोकसभेपासून ग्रामपंचायतींपर्यंत सर्व निवडणुका त्यांना जिंकायच्या आहेत. जे राजकारणात आहेत व राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठीच करायचे हे ज्यांना मान्य आहे, त्यांना निवडणूक युद्धासारखी लढावी लागेल. जिल्हा परिषद निवडणुकांत भाजप 225 जागा जिंकतो, राष्ट्रवादी 165 आणि शिंदे गट 162 जागा जिंकून आघाडी घेतो. हे फक्त सत्ता आणि पैशांनी घडते असे नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या बहुतेक सर्वच माजी नगरसेवकांचा पराभव जनतेने केला. हे नगरसेवक पुन्हा निवडून यावेत यासाठी शिंदे गटाने धरण फुटावे असा पैसा खर्च केला. तरीही यश आले नाही. जिल्हा परिषद निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरातील शिवसेनेचे एक जिल्हाप्रमुख राजू राठोड यांनी पक्षांतर केले व ते शिंदे गटात गेले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांचा गोंदेगाव गट राखीव राहिल्याने या गटातून त्यांचा पत्ता आधीच कट झाला. त्यांनी शेजारील आमखेडा गटातून मुलीला उभे केले. मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी श्री. अंबादास दानवे यांचा फोन आला. ते म्हणाले की, “राजू राठोड यांचे हनुमंतखेडा हे गाव असलेल्या गोंदेगाव गटातून आपल्या शिवसेनेच्या उमेदवार सुनीता चव्हाण निवडून आल्या आहेत. इतकेच नाही तर राजू राठोडच्या मुलीचा आमखेडा गटातून दारुण पराभव झाला आहे.” गोंदेगाव गटातून विजयी झालेल्या उमेदवाराची मी चौकशी केली. दानवे म्हणाले, “तमाशात काम करणाऱ्या एका साध्या कलावंत स्त्रीने शिंदे गटाच्या धनाढ्य उमेदवाराचा पराभव केला.” संभाजीनगरच्या गोंदेगाव व आमखेडा या दोन्ही गटांतून धनशक्तीच्या बळावर आपले उमेदवार निवडून येतील, अशी राठोड यांना खात्री होती. मात्र मतदारांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. शिवसेनेने राठोड यांच्या गावातील सौ. सुनीता चंद्रशेखर चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यांची घरची परिस्थिती बेताची. पती चंद्रकांत हे शासकीय रुग्णवाहिकांवर कंत्राटी पद्धतीने `पार्ट टाइम’ नोकरी करतात. पत्नी घरकाम व मोलमजुरी करते. चंद्रशेखर चव्हाण यांचा लोककला सादरीकरणाचा लहानसा फड आहे. त्यात सुनीता चव्हाणही काम करतात. लग्न समारंभ, अंत्यसंस्काराच्या यात्रेत गाणी व भजने म्हणण्याचे काम हे दाम्पत्य करते, पण सुनीता चव्हाण यांनी राजू राठोड यांनी दिलेल्या शिंदे गटाच्या उमेदवार पूजा वाघ यांचा दारुण पराभव केला. तात्पर्य असे की, फक्त पैशांवरच निवडणुका जिंकायला हव्यात असे नाही. राठोड यांच्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. परभणीतल्या `श्रीमंत’ वरपुडकर घराण्यातील पाच जणांचा जनतेने पराभव केला. लढण्याची जिद्द व प्रेरणादायी नेतृत्व असेल तर राजकारणात पैसा पाचोळ्यासारखा उडून जातो.

नेपोलियनची कबर

निष्ठा आणि विचार आज कोठेच शिल्लक राहिलेला नाही. `बचेंगे तो और भी लढेंगे’ असे पानिपतच्या मैदानावर दत्ताजी शिंदे म्हणाले होते. आता `लढेंगे’ संपले व सगळेच `बचेंगे’च्या मार्गाने निघाले. सगळ्यांनाच आपल्या इस्टेटी व चामडी वाचवायची आहे. एका अज्ञात बेटावर नेपोलियनचा मृत्यू झाला. त्याची कबर ब्रिटिश सैन्याने घेरली होती. नेपोलियनचे डॉक्टर व इतर सरदार फ्रान्सला परत गेले, पण काही एकनिष्ठ सैनिक व सेवक आपल्या राजाच्या प्रेमापोटी तिथेच थांबले. त्यातले काही सेवक इतके कडवट होते की, नेपोलियनचे अवशेष त्यांनी 18 वर्षांनी फ्रान्समध्ये आणले. तोपर्यंत ते त्या कबरीची सेवा करीत राहिले. त्यातील काहींचा तेथेच मृत्यू झाला, तर उरलेले सैनिक नेपोलियनचे अवशेष फ्रान्समध्ये आणल्यावर परतले. हे यासाठी सांगायचे की, आताच्या राजकारणात दत्ताजी शिंदे, नेपोलियन राहिलेले नाहीत व तसे निष्ठावान सैन्य उरले नाही. सैन्य पोटावर चालते, पण आता निवडणुकीतील सैन्य फक्त पैशांच्या बंडलांवर चालते. तरीही एखाद्या फाटक्या उमेदवाराचा विजय होत असतो हे अनेक ठिकाणी दिसले.

भाजपचे `बुथ’ जाळे

मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लढले व जिंकले किंवा हरले, पण सरशी भाजपचीच झाली. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने `बुथ’ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. जेथे कार्यकर्ते नाहीत तेथे इतर पक्षांतले लोक सरळ विकत घेतले. निवडणुका जिंकताना कोणतेही सोवळे भाजप पाळत नाही. भाजपने ग्रामीण महाराष्ट्रातले सर्व `तालेवार’ लोक, कारखानदार आपल्या पक्षात ओढले. त्यांच्या बळावर ते निवडणुका जिंकत आहेत. फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरतात व कार्यक्रम राबवतात. निवडणुका लढणे हाच त्यांचा एककलमी कार्पाम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते स्ट्रॅटेजी’ ठरवतात. पुन्हा सोबतीला पैशांचे बळ आहेच. शिंदे गटाला जिल्हा परिषद निवडणुकीत 162 जागा मिळाल्या. रत्नागिरी, रायगडवर त्यांची सत्ता आली, तर सिंधुदुर्ग भाजपने ताब्यात घेतले. शरद पवारांचा पक्ष विलीनीकरणाच्या गुंत्यात अडकून पडला. पुण्यात ते जिंकले, पण लोक त्यांच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील काय? हा प्रश्न आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली व त्यांच्या पक्षाने 165 जागा जिंकल्या हे मान्य केले तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या शिवसेनेची पीछेहाट राजकीय समतोल बिघडवणारी आहे. शिवसेनेची पीछेहाट म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पीछेहाट. शिंदे यांचे नेतृत्व हे ठाकऱ्यांपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. निवडणुकांना पैसा देईल व निवडणूक जिंकून देईल त्यालाच नेता मानण्याची नवी परंपरा रूढ होत आहे. निवडणुका लढण्याची व जिंकण्याची भूक राजकीय पक्षांच्या नेतृत्वास असायलाच हवी. ती सर्वाधिक भूक आज भाजप, शिंदे गट व अजित पवारांच्या पक्षात दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पीछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणे चुकीचे आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल.

लोकभावना अशी आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. मोदी, शहा, फडणवीस-शिंदे यांनी राजकारणाचे पूर्ण व्यापारीकरण केले हे खरे. तरीही त्यांचेही लोक मोठय़ा प्रमाणात पराभूत झाले व सुनीता चव्हाण यांच्यासारखे साधे उमेदवार आजही लोक निवडून देतात. पैसेवाल्यांच्या टकरीत एका पैसेवाल्याचा नेहमीच पराभव होतो हे रायगड आणि सिंधुदुर्गात दिसले. पुणे-बारामतीत भाजपचा पराभव झाला. तेथे अनेक पैसेवाले अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत. शेवटी आत्मबल आणि जिद्द महत्त्वाची. हरिशंकर परसाई यांनी म्हटले आहे, “आत्मविश्वास अनेक प्रकारचा असतो. पैशांचा, सत्तेचा, बळाचा आणि ज्ञानाचा… पण मूर्खपणाचा आत्मविश्वास `सर्वोपरी’ म्हणजे सर्वोच्च असतो.”

महाराष्ट्रात अशा आत्मविश्वासाचे पीक आले आहे!

जनतेला मूर्ख बनवले जात आहे व मूर्ख बनण्यास जनता तयार आहे!

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Comments are closed.