ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी वणवा भडकला, कर्जतकडे येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांचा जीव सुदैवाने बचावला; मोटरमनची सतर्कता, अर्धा किलोमीटर लोकल मागे नेली
खोपोलीहून कर्जतच्या दिशेने धडधडत निघालेली लोकल आज वणव्याच्या तडाख्यात येता येता वाचली. पळसदरी स्थानकाजवळ ट्रॅकच्या दोन्ही बाजूला सुकलेल्या गवताला आग लागल्याने मोठा भडका उडाला. मात्र हा भयंकर प्रकार मोटरमनच्या लक्षात येताच प्रसंगावधान राखत काही अंतरावरच लोकल थांबवण्यात आली. मात्र वणवा पसरू लागल्याने मोटरमनने लोकल जवळपास पाचशे मीटर मागे घेतली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला, परंतु दीड तास लोकलसेवेचा खोळंबा झाला होता.
खोपोलीहून १२ वाजून ४० मिनिटांची कर्जत शटल निघाली होती. केळवली स्टेशन ओलांडून ही शटल पळसदरी स्टेशनच्या दिशेने निघाली होती. मात्र स्थानकाच्या अगोदर काही अंतरावर रुळाच्या दोन्ही बाजूला सुकलेल्या गवताला मोठी आग लागल्याचे मोटरमनच्या लक्षात आले. जसजशी गाडी जवळ गेली तसे आगीचे लोळ आकाशाच्या दिशेने जाताना स्पष्टपणे दिसत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबले. मात्र वणवा अधिकच पसरू लागल्याने ही शटल जवळपास अर्धा किलोमीटर मागे घेण्यात आली. दीड तासानंतर आग आटोक्यात आल्यानंतर शटल सेवा कर्जतच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रस्ताच नसल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचणार कशा?
कर्जत-खोपोली लोहमार्गावर केळवली, डोळवली, लौजी तसेच पळसदरी स्थानकादरम्यान कोणत्या प्रकारचे वाहन जाईल असा मार्ग नाही. त्यामुळे आज मोठा वणवा भडकूनही अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पाचारण करता आले नाही असे प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, ही आग कोणी जाणीवपूर्वक लावली का? की शेतीच्या मशागतीसाठी लावलेली आग वाऱ्यामुळे पसरली याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
Comments are closed.