महाराष्ट्र-कर्नाटकसह चार राज्यांतील नवीन रेल्वे प्रकल्पांना वेग आला आहे
389 किलोमीटरचे नवीन रेल्वे जाळे उभारणार : ‘सीसीईए’कडून 18,509 कोटींचे तीन रेल्वे प्रकल्प मंजूर
भारतीय रेल्वेचा कायाकल्प
- दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटकला मोठा लाभ
- पीएम-गती शक्ती अंतर्गत कनेक्टिव्हिटी वाढणार
- रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचीही आशा
- प्रकल्पाचे मूल्य – 18,509 कोटी रुपये
- रेल्वेमार्गाचे अंतर – 389 किलोमीटर
नवे रेल्वेमार्ग…
- कसारा-मनमाड तिसरी व चौथी मार्गिका,
- दिल्ली-अंबाला तिसरी व चौथी मार्गिका
- बळ्ळारी-होस्पेट तिसरी व चौथी मार्गिका
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्र सरकारने देशाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने (‘सीसीईए’) रेल्वे मंत्रालयासाठी तीन महत्त्वाच्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मान्यता दिली आहे. कसारा-मनमाड, दिल्ली-अंबाला आणि बळ्ळारी-होस्पेट दरम्यानच्या नव्या मार्गांना मंजुरी मिळाल्यामुळे या व्यस्त मार्गांवर प्रवासी व पर्यटकांचा प्रवास अधिक सुखदायी होणार आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेले हे प्रकल्प दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांमधील 12 जिल्ह्यांना व्यापतील. या विस्तारामुळे विद्यमान भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये अंदाजे 389 किलोमीटर नवीन मार्गांची भर पडेल. एकूण 18,509 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासोबतच मालवाहतुकीची क्षमताही लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या प्रकल्पांमध्ये कसारा-मनमाड, दिल्ली-अंबाला आणि बळ्ळारी-होस्पेट दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे बांधकाम समाविष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
प्रमुख पर्यटनस्थळांवर लक्ष केंद्रित
केंद्र सरकारने मंजूर केलेले हे नवे प्रकल्प प्रवासी, माल आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. प्रस्तावित क्षमता वाढीमुळे देशभरातील अनेक प्रमुख पर्यटनस्थळांना रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल. या पर्यटनस्थळांमध्ये भावली धरण, श्री घाटनदेवी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, कटरा, श्रीनगरमधील श्री माता वैष्णोदेवी आणि हंपी (युनेस्को जागतिक वारसास्थळ), बळ्ळारी किल्ला, दारोजी स्लॉथ बेअर अभयारण्य, तुंगभद्रा धरण, केंचेनगुडा आणि विजया विठ्ठल मंदिर यासारख्या प्रमुख आकर्षणांचा समावेश आहे.
प्रकल्पांचे ‘बहु’उद्देश
सरकारच्या मते, या प्रकल्पांमुळे रेल्वेमार्गाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, कार्यक्षमता वाढेल आणि सेवांची विश्वासार्हता सुधारेल. मल्टी-ट्रॅकिंगमुळे गर्दी कमी होईल आणि रेल्वेसेवा सुव्यवस्थित होईल. हे प्रकल्प पीएम-गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत विकसित केले जाणार आहेत. याचा मुख्य उद्देश मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमता मजबूत करणे आहे. यामुळे प्रवासी, माल आणि सेवांच्या हालचालीसाठी अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल. हे प्रकल्प दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 12 जिह्यांना व्यापत असून ते जवळपास 97 लाख लोकसंख्या असलेल्या अंदाजे 3,902 गावांना सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. हे मार्ग कोळसा, पोलाद, लोहखनिज, सिमेंट, अन्नधान्य, खते, कंटेनर आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या प्रमुख मालवाहतुकीच्या वाहतुकीसाठी देखील महत्त्वाचे आहेत. क्षमता वाढीमुळे दरवर्षी अतिरिक्त 96 दशलक्ष टन मालवाहतुकीची भर पडण्याची अपेक्षा आहे.
Comments are closed.