टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅट्ट्रीक! 19 वर्षांनंतर घडले ‘हे’, न्यूझीलंडचा पहिला पराभव

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये शनिवारी (१४ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सलग तीन सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने पहिला सामना गमावला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट्स गमावत १७५ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने कर्णधार एडन मार्करमच्या स्फोटक खेळीमुळे १७.१ षटकातच लक्ष्य गाठले. यामुळे ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अनेक विक्रमे केली.
दक्षिण आफ्रिकेने २००७नंतर प्रथमच १५० पेक्षा अधिक धावसंख्येचे लक्ष्य पूर्ण केले.
या सामन्यात मार्करमने ४४ चेंडूत ६ षटकार आणि ४ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ८६ धावा केल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच त्याने क्विंटन डी कॉकसोबत पहिल्या विकेटसाठी २८ चेंडूत ६२ धावांची, रियान रिकल्टनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४० धावा (१८ चेंडू), तिसऱ्या विकेटसाठी डेवाल्ड ब्रेविससोबत २९ धावा (२४ चेंडू) आणि चौथ्या विकेटसाठी डेविड मिलरसोबत ४७ धावांची (३३ चेंडू) भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमालीची कामगिरी केली.
वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनने ४ षटकात ४० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तोच या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच ठरला. त्याने न्यूझीलंडचे पहिले तीन फलंदाज बाद केले. यामध्ये टीम सीफर्ट, फिन ऍलन, रचिन रविंद्र आणि मार्क चॅपमन यांचा समावेश आहे. तसेच लुंगी एनगिडी, केशव महाराज आणि कॉर्बिन बॉस्च यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्येच तीन विकेट्स गमावल्या. यान्सेनने टाकलेले ते सहावे षटक न्यूझीलंडसाठी चांगलेच भारी पडले. त्यामध्ये त्याने रविंद्र आणि ऍलन यांच्या विकेट्स घेतल्या.
Comments are closed.