पंचलाइन – स्फोटक विचारक

>> अक्षय शेलार, [email protected]

विनोदाच्या माध्यमातून समाजाची दांभिकता आणि पोकळ सांस्कृतिक, नैतिक, सामाजिक चौकटी उद्ध्वस्त करत निर्भीड आणि विस्फोटक मांडणी करणारा अमेरिकन स्टँड-अपमधील कॉमेडियन डग स्टॅनहोप. प्रेक्षकांच्या आस्थेच्या मुद्दय़ांना हात घालणारी डग स्टॅनहोपची कॉमेडी एका क्षणी प्रेक्षकांना अस्वस्थ करणारीही ठरते.

डग स्टॅनहोप हा अमेरिकन स्टँड-अपमधील सर्वात निर्भीड आणि विस्फोटक कॉमेडियन आहे. हा विस्फोट अर्थातच वैचारिक मांडणी आणि विनोदाचे मिश्रण या स्तरावरील आहे. तो स्टेजवर उभा राहून प्रेक्षकांना खुश करण्याचा प्रयत्न करत नाही. उलट तो प्रेक्षकांच्या आस्थेच्या मुद्दय़ांना मुळातून सुरुंग लावून त्यांना मुद्दाम अस्वस्थ करतो, चिडवतो, आणि त्यांच्या नैतिकरीत्या सुरक्षित भूमिकेवर थेट हल्ला करतो. त्यामुळेच स्टॅनहोपला पारंपरिक अर्थाने ‘कॉमेडियन’ म्हणणं अपुरं वाटतं. तो दोषैकवृत्ती असलेला विचारवंत आहे. तो विनोदाच्या माध्यमातून समाजाची दांभिकता आणि पोकळ सांस्कृतिक, नैतिक, सामाजिक चौकटी उद्ध्वस्त करतो.

स्टॅनहोपच्या विनोदाचं वैशिष्टय़ म्हणजे त्याचा कटू प्रामाणिकपणा. हे वैशिष्टय़ थोडय़ाफार प्रमाणात जॉर्ज कार्लिन, रिकी जर्वेस यांच्यासारखं आहे. तो आत्महत्या, व्यसन, धर्म, राष्ट्रवाद, युद्ध आणि राजकीय दांभिकता यांसारख्या विषयांवर इतक्या उघडपणे बोलतो की, अनेकांना प्रथमदर्शनी ते नुसतं धक्कादायकच नव्हे, तर आक्षेपार्ह वाटतं. मात्र, केवळ सनसनाटीपणा हा त्याचा हेतू नसतो. कारण, तो नैतिकतेच्या नावाखाली लपवलेल्या मूलभूत ढोंगीपणावर, आदिम संवेदनांवर हल्ला चढवतो. उदाहरणार्थ, इच्छामरण किंवा युद्धात सामील सैनिकांबद्दल तो जेव्हा बोलतो, तेव्हा तो पोकळ संवेदनशीलतेचा आव आणत नाही. तो आपले मुद्दे थेट, रोखठोकपणे मांडतो. आपण ज्या गोष्टींना इतके महत्त्व देतो, त्या खरोखरच तितक्या महत्त्वपूर्ण आहेत का, असा प्रश्न तो विचारतो.

लांबलचक, तपशीलवार व तरीही भरकटणारे आणि आत्मचरित्रात्मक विनोद हे त्याच्या कामाचं स्वरूप. तो स्वतच्या व्यसनांबद्दल सांगतो, आईबद्दल आणि तिच्या व्यसनांबद्दल बोलतो, आणि स्वतच्या अपयशांचा उल्लेखही फार प्रामाणिकपणे करतो. मात्र, या वैयक्तिक कथांमधून तो एक व्यापक सामाजिक भाष्य करतो. स्टॅनहोप कसलीही भीड बाळगत नाही. तो स्वतला ‘नायक’ बनवत नाही; उलट तो स्वतलाच समाजाच्या कुरूपतेचं उदाहरण बनवतो. या प्रक्रियेत त्याचा विनोद अधिकच धारदार होतो, कारण तो इतरांवर बोट दाखवताना अगदी स्वतलाही वाचवत नाही. इतरांना आरसा दाखवताना स्वतही आरशात पाहणं महत्त्वाचं असतं, हे त्याला आकळलेलं आहे.

स्टॅनहोपच्या कामात एक विलक्षण प्रकारची बेफिकिरी दिसते. तो स्टेजवर उभा राहून बीअर घेतो, सिगारेट ओढतो, प्रेक्षकांशी उलटसुलट संवाद साधतो आणि कधी कधी स्वतचा सेट (आधीच लिहिलेले, सादर करणं अपेक्षित लिहिलेले विनोद) पूर्णपणे मोडीत काढतो. ही अनियंत्रित, बेधडक वाटणारी शैली प्रत्यक्षात अतिशय जाणीवपूर्वकपणे तयार केली आहे. त्याला ठरवून ‘क्लीन’ किंवा ‘सेफ’ राहायचं नाही. त्याच्या दृष्टीने कॉमेडी ही एक सुरक्षित जागा नसून, ती संघर्षाची जागा आहे. प्रेक्षकांनी त्याच्यावर चिडावं, नापसंतीचा सूर आळवावा या प्रतिक्रियांनाही तो त्याच्या कामगिरीचाच भाग मानतो. इथे नॉर्म मॅकडोनल्ड हा आणखी एक कॉमेडियन आठवतो. त्याला तर प्रेक्षकांनी आपल्या विनोदावर न हसण्यातून असुरी आनंद मिळत असे!

स्टॅनहोप हा अफाट बुद्धिमत्ता असलेला लेखक, विचारवंत आहे. त्याचे विनोद वरवर गोंधळलेले किंवा बेफिकीर वाटू शकतात, पण त्यामागे विचारांची सुसंगत रचना असते. तो एखाद्या सामाजिक संकल्पनेला उचलतो, तिचं विच्छेदन करतो, तिच्यातील विरोधाभास उघड करतो, आणि मग त्या सगळ्याला एका कटू पंचलाइनमध्ये बांधतो. त्यामुळेच त्याच्या विनोदात केवळ आक्रमकता नसून तर्कशुद्धतेची धार आहे. उदा. तो म्हणतो की, तुम्ही नागरी युद्धापूर्वीच्या अमेरिकेत राहणारे कृष्णवर्णीय असाल आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रवेश नसेल, तर तुम्ही संघर्ष करून तिथे प्रवेश मिळवण्याचा हक्क मिळवावा. कारण, तो तुमचा मानवी अधिकार आहे. मात्र, हक्क मिळाल्यावर तिथे अजिबात जाऊ नये. का, तर तुम्ही एका वर्णद्वेष्टय़ा माणसाला नफा मिळवून देण्यात काहीच हशील नाही. संघर्ष करून, हक्क मिळवून नंतर तो सोडून देण्यात खरी गंमत आणि व्यापक दृष्टी आहे, असं त्याचं म्हणणं.

आजच्या काळात विनोद काहीतरी विकण्याचं (मग तो एखादा ब्रँड असेल किंवा मग एखादं उत्पादन असेल) आणि सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्याचं साधन बनला आहे. अशा जगात स्टॅनहोपसारखा कलाकार अधिकच वेगळा ठरतो. कारण, तो लोकप्रियतेच्या गणितात बसत नाही. त्याचे विनोद सर्वांना आवडत नाहीत, आणि त्याला त्याची पर्वा नाही. तो ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, त्या तो निर्भीडपणे मांडतो. त्यामुळेच डग स्टॅनहोपची कॉमेडी ही अनेकांना आनंददायक वाटत नाही. पण, ती प्रामाणिक आहे. कधी कधी इतका प्रामाणिकपणाही लोकांना असह्य वाटतो. म्हणूनच, तो स्टँड-अपमधील एक न भूतो, न भविष्यती प्रकारातील कॉमेडियन ठरतो. त्याला सहज ओलांडून किंवा वगळून पुढे जातच येत नाही.

(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)

Comments are closed.