राहुल गांधींचे राजकारण नकारात्मक आहे
भारत-अमेरिका करारासंबंधी गोयल यांचे टीकास्त्र : या करारात भारताच्या शेतकऱ्यांचे पूर्ण संरक्षण, करार भारतासाठी हिताचा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांनी घोषित केलेला व्यापार करार भारतासाठी अत्यंत लाभदायक आहे. भारताच्या कृषी क्षेत्राचे या करारात पूर्णत: संरक्षण करण्यात आलेले आहे. तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी यासंदर्भात नकारात्मक राजकारण करत असून जनतेमध्ये भ्रम पसरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. तथापि, त्यांचे हे प्रयत्न फोल ठरणार आहेत, असे प्रतिपादन पियुष गोयल यांनी केले आहे. ‘एक्स’ माध्यमावरुन त्यांनी या करारातील महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत.
सततच्या अपयशाने राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष निराश झालेले असून त्यामुळे ते या करारासंदर्भात जनतेत भीती निर्माण करण्याची चाल खेळत आहेत. त्यांचे हे नेहमीचे तंत्र आहे. जनतेलाही आता हे तंत्र चांगलेच परिचित झाल्याने जनता त्यांना दाद देत नाही. त्यांनी कितीही गोंधळ पसरविण्याचा प्रयत्न केला, तरी या कराराचे अंतिम स्वरुप स्पष्ट झाल्यानंतर त्यांची टीका बंद होईल. हा करार भारताच्या हितांचा पूर्ण विचार करुनच झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बांगला देशसंबंधी स्पष्टीकरण
बांगला देशच्या वस्त्रप्रावरण आयातीवर अमेरिकेने शून्य शुल्क लावले आहे. मात्र, भारताच्या वस्त्रप्रावरण निर्यातीवर 18 टक्के कर लावला आहे, असा धादांत खोटा अपप्रचार गांधी करीत आहेत. मात्र, ही वस्तुस्थिती नाही. बांगला देशने कच्चा माल अमेरिकेतून आयात केला आणि त्याच्यापासून वस्त्रप्रावरणे बनवून ती अमेरिकेला निर्यात केली, तरच शून्य टक्के कर लावला जाणार आहे. अन्यथा बांगला देशच्या कपड्यांवर भारतापेक्षाही अधिक कर आहे. तसेच जी सूट बांगला देशला मिळाली आहे, तीच सूट भारतालाही मिळणार आहे. हे चित्र स्पष्ट होण्यासाठी आपल्याला काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार असून त्यानंतर, या कराराचा भारताला कसा लाभ होणार, हे पूर्णत: उघड होईल. गांधी यांनाही याची कल्पना आहे. पण ते राजकीय लाभ उठविण्यासाठी जनतेची दिशाभूल करत आहेत. योग्य वेळी ते उघडे पडतीलच, अशी टीकाही पियुष गोयल यांनी केली.
45 लाख कोटींची बाजारपेठ
गेल्या काही महिन्यांमध्ये भारताने 38 विकसीत देशांसमवेत 9 मुक्त व्यापार करार केले आहेत. भारताच्या वस्त्रोद्योगाला त्यांचा प्रचंड लाभ होईल. या करारांमुळे विकसीत देशांमधील 45 लाख कोटी रुपयांची वस्त्रप्रावरण बाजारपेठ भारताला मोकळी होत आहे. सध्या आपण केवळ 4 लाख कोटी रुपयांची वस्त्रप्रावरणे निर्यात करत आहोत. विकसीत बाजारपेठ याच्या दसपटीहून मोठी आहे. त्यामुळे भारताला निर्यातवाढीसाठी किती मोठी संधी आहे, हे स्पष्ट होते, अशी मांडणी त्यांनी केली.
गांधीना नाही पुरेशी माहिती
राहुल गांधी त्यांच्या नकारात्मक राजकारणासाठी भारताच्या वस्त्रनिर्यादारांवरही हल्लाबोल करीत आहेत. तथापि, त्यांना हे माहीत नाही, की अमेरिकेने कापसाचे उत्पादन अत्यंत कमी होते. अमेरिका केवळ 600 कोटी डॉलर्सचा कापूस निर्यात करतो. गांधी यांना हेही माहीत नाही, की बांगला देश भारताकडून 270 कोटी डॉलर्सचा कापूस आयात करतो. बांगला देशला हा कापूस भारताकडून घ्यावाच लागणार आहे, कारण अमेरिकेचा कापूस अपुरा आहे. त्यामुळे भारताच्या कापसाला आणि वस्त्रप्रावरणांना जगात मागणी वाढत जाईल. तरीही गांधी अपप्रचार करत असल्याने त्यांना निवडणुकांमध्ये अपयश येते, अशी टीका त्यांनी केली.
लोकांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास
राहुल गांधी यांनी कितीही असत्य फैलावण्याचा प्रयत्न केला, तरी भारतातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याने गांधी यांचे प्रयत्न सपशेल फसणार हे निश्चित आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार भारताच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक असून त्यात भारताच्या संवेदनशील क्षेत्रांना पूर्णत: संरक्षित करण्यात आले असल्याची वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली आहे.
Comments are closed.