सामना प्रभाव- ब्रिटिशकालीन गारगाई पूल अखेर दुरुस्त; बांधकाम विभागाला खडबडून जाग
मोखाडा, खोडाळा, विहिगाव राज्य महामार्गावरील ब्रिटिशकालीन गारगाई पुलाच्या तुटलेला संरक्षण कठड्याच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून या पुलाचा संरक्षण कठडा कोसळला होता. त्यामुळे पुलावर अपघातांचे प्रमाण वाढले होते. दैनिक ‘सामना’च्या दणक्यानंतर खडबडून जाग आलेल्या बांधकाम विभागाने तत्काळ दुरुस्तीला सुरुवात करून दोनच दिवसांत संरक्षण कठड्याचे काम पूर्ण केले.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तसेच मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाला जोडणारा मोखाडा, खोडाळा, विहिगाव हा महत्त्वाचा राज्य महामार्ग आहे. या मार्गावरील गारगाई नदीवर ब्रिटिशकालीन बांधणीचा दगडी पूल आहे. हा पूल २५ मीटर खोल व ३० मीटर लांबीचा आहे. पुलाच्या पश्चिमेकडील संरक्षण कठड्याचा भाग वर्षभरापूर्वी कोसळला होता. अखेर ११ फेब्रुवारी रोजी दैनिक ‘सामना’ने गारगाई पुलावर ‘नजर हटी दुर्घटना घटी’ ही बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बातमीची दखल घेत तत्काळ या पुलाच्या दुरुस्तीचे काम घेतले आणि दोनच दिवसांत ते काम पूर्ण केले.
Comments are closed.