सुरू असलेल्या टी20 वर्ल्डकपच्या मध्येच ‘हा’ खेळाडू गेला घरी, दुखापत नाही तर वेगळेच कारण

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेचे सामने भारत आणि श्रीलंकेत खेळले जात आहेत. यामध्ये अनेक खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला, त्यामुळे ते स्पर्धेबाहेर झाले आहेत. आता न्यूझीलंडचा खेळाडू स्पर्धेच्या मधूनच घरी परतला आहे. त्याला कोणतीही दुखापत झाली नसून त्याचे घरी जाण्यामागचे कारण आहे विशेष.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन अचानक घरी गेला आहे. त्याच्या जाण्याची माहिती न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापकांनी दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर (१४ फेब्रुवारी) तो घरी परतला आहे. न्यूझीलंडने त्याच्या घरी परतण्यामागचे कारण सांगितले आहे. त्याची पत्नी एम्मा ही त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असून त्या खास क्षणी लॉकीला त्याच्या पत्नीसोबत राहायचे आहे, यामुळेच तो त्वरीत घरी गेला आहे.
लॉकीच्या घरी जाण्यामुळे तो कॅनडा विरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. न्यूझीलंडचा हा सामना १७ फेब्रुवारीला असून तो चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. त्याच्याजागी कोण, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी म्हटले, “आम्ही त्याच्याजागी कोणाला घेणार नसून तो सुपर-८च्या सामन्यांपर्यंत संघात परत येईल.”
तसेच गरज पडली तर न्यूझीलंडकडे ट्रॅव्हलिंग रिजर्व म्हणून बेन सियर्स आणि कोल मॅकॉन्ची आहेत. या विश्वचषकात फर्ग्युसनने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ३ सामने खेळले असून त्यामध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत. यावरून तो संघाचा किती महत्वाचा खेळाडू आहे हे कळते.
Comments are closed.