कोल्हापुरात अवतरला हिंदुस्थानातील सर्वांत लांब साडेपाच फुटांचा सरडा
खास रंग बदलणारे साधारण पाऊण फूट लाबीपर्यंत सरडे आपल्या अवतीभवती दिसून येतात. मात्र, सध्या कोल्हापुरात भरलेल्या भीमा कृषी प्रदर्शनात हिंदुस्थानातील सर्वांत लांब सरडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तब्बल 20 किलो वजन आणि साडेपाच फूट लांबीचा इग्वाना जातीचा हा सरडा आठ वर्षांचा आहे. मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या मुंबईत असलेले किशोर चव्हाण या सरडय़ाचे पालक आहेत. महाराष्ट्रातील वातावरणाशी हा सरडा एकरूप झाला आहे.
मध्य व दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणारा दुर्मिळ जातीचा इग्वाना सरडा आपल्या खास वैशिष्टय़ांसाठी ओळखला जातो. जन्मता करडय़ा रंगाचा असलेला हा सरडा वातावरणीय बदलानुसार आपल्या त्वचेचा रंग बदलत असतो. जगभरात या प्रजाती आढळतात. कोल्हापूरचे प्राणीप्रेमी किशोर चव्हाण यांनी केरळमधून आठ वर्षांपूर्वी या सरडय़ाचे लहान पिल्लू आणले होते. प्राण्यांच्या पालनपोषणाची खास आवड असलेल्या चव्हाण यांनी घरातच अनेक प्राणी पाळले आहेत. गेली आठ वर्षे ते या सरडय़ाचे पालनपोषण करत आहेत. वैशिष्टय़पूर्ण लांबीमुळे महाराष्ट्रातील मुंबई, चिपळूणसारख्या शहरात आयोजित केलेल्या प्रदर्शनातही हा सरडा सहभागी झाला होता.
दररोज आंघोळ, संतुलित भाज्या, गाजर, काकडी, भोपळा, कोथिंबीर हे अन्नपदार्थ तो खात असल्यामुळे पूर्णपणे हा शाकाहारी सरडा पाहायला मिळतो. मुंबईसारख्या दमट हवामानाच्या प्रदेशातही शारीरिक क्षमता मजबूत झाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ढगाळ वातावरण असेल तर उष्णता निर्माण करणाऱ्या बलाचाही घरात वापर केला जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले, तर यातील मादी सरडा एका वर्षात दोनदा पिलांना जन्म देते. केरळमधून आणलेल्या या सरडय़ाचे नाव ‘टोण्या’ असे ठेवण्यात आले आहे, तर मादीचं नाव ‘राखा’ असे आहे.
आठ वर्षांपूर्वी चव्हाण यांनी नर इग्वाना आणला होता. तो आता 8 वर्षांचा आहे, तर मादी राखा 4 वर्षांची आहे. यानंतर अवघ्या सहा महिन्यांची सिया ही हिरव्या रंगामुळे पशुप्रेमींचं लक्ष वेधून घेते. जन्मताच हिरवा रंग या सरडय़ाला प्राप्त झालेला असतो; पण कालांतराने त्वचेच्या रंगात बदल होत जाऊन सरडा प्रौढ होईपर्यंत आणि पूर्ण क्षमतेने वाढ होईपर्यंत सरडय़ाची त्वचा तपकिरी रंगाची झालेली असते.
सरडय़ाचा प्रजनन काळ
इग्वान जातीच्या मादी सरडय़ाचा वर्षातून दोनदा प्रजनन काळ असतो. एक वेळेस मादी सरडा 20 ते 22 अंडी घालते, तर दर सहा महिन्यांनी किमान 15 हून अधिक पिलांना जन्म देऊ शकते. जंगल आणि रानावनातील सरडे हे मांसाहारी कीटक खातात, पण किशोर चव्हाण यांनी पाळलेला हा सरडा शाकाहारी अन्न खातो. हे या सरडय़ाचे खास वैशिष्टय़ आहे.
Comments are closed.