काँग्रेसनेच आसाममध्ये फूट पाडली!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर सभेत घणाघात : आसामसह ईशान्य भारताच्या विकासावर रालोआचा भर

वृत्तसंस्था/गुवाहाटी

‘काँग्रेसने सातत्याने आसाम आणि ईशान्य भारताच्या हितांची हेळसांड केली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात आसामला आर्थिक विकासापासून वंचित ठेवण्यात आले. तसेच या राज्यात काँग्रेसनेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी फुटीरतावादाला प्रोत्साहन दिले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केली आहे. ते शनिवारी येथील एका विशाल जाहीर सभेत भाषण करीत होते. या सभेपूर्वी त्यांनी गुवाहाटीमधून एक भव्य रोड शोही केला.

साडेअकरा वर्षांपूर्वी केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर आसाम आणि ईशान्य भारताच्या विकासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आहे. गेल्या अकरा वर्षांच्या काळात आसामला केंद्र सरकारकडून 5.5 लाख कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. या राज्यात या दशकात जितकी विकासकामे झाली, तितकी त्यापूर्वीच्या 68 वर्षांमध्ये झाली नव्हती. आसाममधील जनता हे जाणते. त्यामुळे काँग्रेस विफल ठरत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

देशाच्या सुरक्षेची हेळसांड

काँग्रेसच्या सत्ताकाळात देशाच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. केवळ निवडणुका जिंकणे आणि त्या जिंकण्यासाठी समाजात फूट पाडून मतांचे ध्रुवीकरण करणे असे उपद्व्य ाप काँग्रेसने सातत्याने केले आहेत. काँग्रेसने बेकायदा घुसखोरीला प्रोत्साहन दिले आणि घुसखोरांना संरक्षणही दिले. या घुसखोरांमध्ये या पक्षाला आपली मतपेढी दिसत होती. आम्ही ही परिस्थिती फिरविणार असून त्यासाठीच जनता आमच्या पाठीशी उभी आहे, असे विचारही त्यांनी व्यक्त केले.

फाळणीला मुस्लीम लीग जबाबदार

भारताला स्वातंत्र्य मिळत असताना देशाची धर्माच्या आधारावर फाळणी झाली. ती मुस्लीम लीगच्या धर्मांधतेपोटी झाली. आता काँग्रेस मुस्लीम लीगप्रमाणेच वागत आहे. काँग्रेसची आता एमएमसी, म्हणजेच माओईस्ट मुस्लीम काँग्रेस झाली आहे. तथापि, काँग्रेसच्या योजना आम्ही हाणून पाडणार आहोत. बेकायदा घुसखोरीचा अंत घडविण्याचे आमचे ध्येय आहे. त्यामुळे पुढची पाच वर्षे आसामसाठी अत्यंत महत्वाची आहेत, हे स्पष्ट करत त्यांनी जनतेला पाठिंबा राखण्याचे आवाहन केले.

आज काँग्रेस अधिक धोक्याची

गेली सलग दहा वर्षे आसाममध्ये काँग्रेस सत्तेबाहेर आहे. त्यामुळे तो पक्ष अधिक धोकादायक बनला आहे. नैराश्यापोटी या पक्षाचे नेते विषारी विधाने करीत आहेत. आमच्या सत्तेपूर्वीच्या 70 वर्षांमध्ये आसाममध्ये काँग्रेसच्या प्रशासनांनी केवळ तीन मोठे सेतू उभारले आहेत. तथापि, भारतीय जनता पक्षाने आपल्या केवळ 10 वर्षांच्या काळात ब्रम्हपुत्रा नदीवर पाच मोठ्या सेतूंची निर्मिती केली आहे. आमच्या काळात आसामची सर्वांगिण प्रगती होत असून   निवडणुकीनंतरही आमच्याकडून ती अशाच प्रकारे होत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रचाराचाच प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुवाहाटीतील भाषण हा भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचाच शुभारंभ मानण्यात येत आहे. येत्या एप्रिल-मेमध्ये या राज्यात, अन्य तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासह विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष होत आहे. ही निवडणूक चुरशीची होईल, असे अनुमान आहे.

Comments are closed.