कोब्रा बटालियनचे चार जवान मारले गेले

छत्तीसगडमध्ये पार्क केलेल्या ट्रकला कारची धडक

वृत्तसंस्था/रायपूर

छत्तीसगडच्या धमतरी जिह्यात शनिवारी एक हृदयद्रावक रस्ते अपघात झाला आहे. कोब्रा बटालियनच्या सैनिकांना जगदलपूरहून रायपूरला घेऊन जाणारी एक कार खापरी बायपासवर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात चार जवानांना जीव गमवावा लागल्यामुळे संपूर्ण सुरक्षा दलात खळबळ उडाली. रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक हा या घातक अपघाताचे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. कारमधून प्रवास करणारे सैनिक रायपूरला महत्त्वाच्या कर्तव्यासाठी जात होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत ते धमतरी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. याप्रकरणी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

कोब्रा बटालियनचे सैनिक जगदलपूरहून रायपूरला कारने जात असताना हा भीषण अपघात झाला. धमतरीतील खापरी गावाजवळ बायपास रस्त्यावर त्यांची कार पोहोचली तेव्हा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या दर्शनी भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतरचे दृश्य भयानक होते. कार पूर्णपणे चेपल्यामुळे आत असलेले सैनिक रक्ताने माखलेले होते. अडकलेल्या सैनिकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना गॅस कटरचा वापर करावा लागला. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर जखमी झालेल्या जवानांना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले.

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी दिली. हेड कॉन्स्टेबल मुकेश कुमार, एएसआय उमेंद्र सिंह, कॉन्स्टेबल राजकुमार गौर आणि नागरी चालक हीरा लाल नागर अशी मृतांची नावे आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन सैनिकांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात एक सैनिक अभिमन राय गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी धमतरी जिल्हा रुग्णालयातून रायपूरला रेफर करण्यात आले. त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Comments are closed.