Dombivli Fire – डोंबिवलीत अग्नीतांडव! रहिवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, 29 दुचाकी जळून खाक, 5 जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रविवारी पहाटेच्या सुमारास डोंबिवलीत अग्नितांडव पहायला मिळाले. डोंबिवली पूर्व भागात येणाऱ्या छेडा नगरमधील सागाव येथील रविकिरण सोसायटीच्या बेसमेंटमध्ये असणाऱ्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या आगीत 29 दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून 5 रहिवासी जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे सवा चारच्या सुमारास ही घटना घडली.

पहाटेच्या वेळी सर्व रहिवासी गाढ झोपेत असताना अचानक बेसमेंटमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा आवाज आणि पायऱ्यांमध्ये पसरलेल्या दाट धुरामुळे इमारतीत एकच खळबळ उडाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रहिवासी घराबाहेर पडले, मात्र या गोंधळात धुरामुळे श्वास कोंडून आणि किरकोळ भाजल्याने 5 जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वरच्या मजल्यांपर्यंत पसरली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

प्राथमिक अंदाजानुसार, पार्किंगमधील एखाद्या वाहनात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

Comments are closed.