किडनी रॅकेट प्रकरण – तपासात आरोपी डॉक्टर सिंगचे असहकार्य; सर्व प्रश्नांना‘आय डोन्ट रिमेंबर’ हेच उत्तर
संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या बहुचर्चित किडनी रॅकेट प्रकरणातील दिल्ली येथील मुख्य संशयित डॉ. रवींद्रपाल सिंग पोलिसांच्या चौकशीत सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दिलेल्या सशर्त अटकपूर्व जामिनानुसार डॉ. सिंग सध्या चंद्रपूर येथील तपासी अधिकाऱ्यांकडे दररोज हजेरी लावत आहे. मात्र चौकशीदरम्यान पोलिसांनी विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना तो वारंवार “आय डोन्ट रिमेंबर” असे उत्तर देत असल्याने तपासात अडथळे येत असल्याची माहिती आहे.
नागभीड येथील रोशन कुडे किडनी प्रकरणाच्या तपासात, त्रिची येथील स्टार क्रिम्स हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले होते. या शस्त्रक्रियांमध्ये डॉ. राजरत्नम गोविंदसामी आणि डॉ. रवींद्रपाल सिंग यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. डॉ. सिंग याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चंद्रपूर तपासी अधिकाऱ्यांकडे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की दिल्लीहून त्रिची येथे किडनी शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. सिंग तब्बल ३५ लाख रुपये घेत होता. या रकमेतील वाटप, अन्य सहभागी आणि रॅकेटमधील इतर धागेदोरे याबाबत तो समाधानकारक उत्तरे देत नसल्याने पोलिसांची अडचण वाढली आहे. पोलिसांकडून त्याच्या असहकार्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारी रोजी डॉ. सिंगच्या अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी होणार असून, न्यायालय जामीन कायम ठेवते की पोलिसांना त्याची कोठडी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.