भारताकडून पाकिस्तान 8 विकेट्सने पराभूत, स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला

एसीसी विमेंस एशिया कप रायजिंग स्टार्स २०२६मध्ये रविवारी (१५ फेब्रुवारी) भारत ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना खेळला गेला. बॅंकॉकमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ८ विकेट्स आणि ५९ चेंडू शिल्लक राखत मोठा विजय मिळवला आहे. पाकिस्तानने दिलेले ९४ धावांचे लक्ष्य भारताने १०.१ षटकातच पूर्ण केले आहे. यामध्ये सलामीवीर वृंदा दिनेशची खेेळी उल्लेखनीय ठरली. यामुळे तिच ‘प्लेयर ऑफ द मॅच’ची मानकरी ठरली.

या स्पर्धेत भारताचा शेवटचा साखळी सामना १७ फेब्रुवारीला नेपाळविरुद्ध आहे. या स्पर्धेत भारत राधा यादवच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. युएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत ७ विकेट्सने पराभूत झाला होता. दुसरीकडे पाकिस्तानने त्यांचा पहिला सामना जिंकला होता. त्यांनी नेपाळला ३० धावांनी हरवले होते. यामुळे भारत पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत होता, जो आज त्यांना मिळाला.

पाकिस्तानविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अडखळत सुरूवात झाली. हुमैरा काझी शून्यावर बाद झाली. त्यानंतर वृंदाने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिने अनुष्का शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. अनुष्का २४ धावा करत बाद झाली. मग वृंदाने तेजल हरबनीससोबत संघाला विजय मिळवून दिला. तेजल १२ धावा (५ चेंडू) आणि वृंदा २९ चेंडूत ५५ धावा करत नाबाद राहिल्या.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच त्यांच्यावर दबाव निर्माण केला. त्यामुळे त्यांनी १८.५ षटकात सर्व विकेट्स गमावत ९३ धावाच केल्या. पाकिस्तानच्या सुरूवातीपासूनच विकेट्स पडत राहिल्या. शवाल जुल्फिकार, गुल रुख आणि अनोशा नासिर यांच्याव्यतिरिक्त बाकी खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. पाकिस्तानकडून सर्वोच्च धावा शवालने केल्या. तिने २९ चेंडूत ३ चौकार मारत २३ धावा केल्या.

गोलंदाजीमध्ये भारताकडून राधा, सईमा ठाकोर आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. जिंतीमणी कलिता आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.

Comments are closed.