येळकोट येळकोट जय मल्हार; खंडोबा गडावर त्रिलोकातील दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा गडावर महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. वर्षातून केवळ एकदाच उघडल्या जाणाऱ्या त्रिलोकातील (स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ) शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गडावर प्रचंड गर्दी केली होती. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आणि ‘ओम नमः शिवाय’च्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता.

खंडोबा गडाच्या शिखरात असलेल्या ‘स्वर्ग लोकातील’ शिवलिंगाचे आणि मुख्य मंदिराच्या गर्भगृहातील ‘पाताळातील’ शिवलिंगाचे दरवाजे केवळ महाशिवरात्रीलाच उघडले जातात. मध्यरात्री १२ वाजता या गुप्त लिंगांचे दरवाजे उघडून स्वच्छता, अभिषेक आणि मानाच्या पूजा संपन्न झाल्या. रात्री २ वाजेपासून भाविकांसाठी हे दर्शन खुले करण्यात आले. खंडोबाचे रोजचे दर्शन हे ‘भूलोकातील’ दर्शन मानले जाते, मात्र आज या दोन्ही गुप्त लिंगांच्या दर्शनाचा लाभ मिळाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

दर्शनासाठी ५ ते ६ तासांची प्रतीक्षा

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी रात्री ९ वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या. शिखरातील शिवलिंगाच्या दर्शनासाठी ५ ते ६ तास, तर मुख्य गाभाऱ्यातील दर्शनासाठी २ ते अडीच तास लागत होते. भाविकांनी अत्यंत श्रद्धेने शिवलिंगावर बेल, भंडारा, खोबरे आणि सुगंधी दवणा अर्पण केला. यावेळी संपूर्ण गडावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची मनमोहक आरास करण्यात आली होती.

Comments are closed.