संगमेश्वरातील कनकाडी परिसरात वणवा; 600 काजू कलमे जळून खाक, 10 बागायतदारांचे लाखोंचे नुकसान

संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे–कनकाडी परिसरात शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण वणव्यामुळे कष्टकरी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. अवघ्या काही क्षणांत सुमारे 600 काजू कलमे आगीत जळून खाक झाली. तब्बल 20 वर्षांची मेहनत, काळजी आणि आशा डोळ्यादेखत राख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत 10 बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच विलास सोना सुकम, सोना सखाराम सुकम, रमेश लक्ष्मण जाधव, भीमराज चंद्रकांत जाधव, अनंत लक्ष्मण जाधव, प्रदीप सखाराम जाधव, प्रकाश गोविंद जाधव, संदीप जयराम जाधव, प्रकाश कृष्णा गराटे आणि बाबू लक्ष्मण जाधव हे बागायतदार घटनास्थळी धावले. त्यांनी हाताशी मिळेल त्या साधनांनी—पाणी, फांद्या आणि मातीच्या साहाय्याने—आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वारा आणि सुकलेल्या गवतामुळे आग वेगाने पसरली आणि बाग वाचवणे अशक्य ठरले.

स्थानिक शेतकऱ्यांनी भातशेतीचे प्रमाण कमी केल्याने शेतांमध्ये वाढलेले सुकलेले गवत वणव्यासाठी इंधन ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे सुरू केले. कृषी अधिकारी चौगुले, तलाठी डोंगरे, पोलीस पाटील सौ. खांदारे तसेच माजी उपसरपंच हेमंत शिंदे यांनी प्रत्यक्ष बागेत जाऊन पाहणी केली. उत्पन्नाच्या उंबरठ्यावर असलेली 20 वर्षांची झाडे जळून खाक झाल्याचे दृश्य पाहून अधिकाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली.

“20 वर्षे आम्ही या झाडांना पाणी घालून, जीव ओतून वाढवले. आज ती राख झाली. केवळ पंचनामे नकोत; त्वरित आणि योग्य नुकसानभरपाई मिळाली, तरच आम्ही पुन्हा उभे राहू,” अशी आर्त मागणी बागायतदारांनी केली आहे.

Comments are closed.