IND vs PAK: लाजिरवाण्या विक्रमांच्या यादीत अभिषेक शर्माची नोंद! टीम इंडियाचा ‘हा’ दिग्गज खेळाडू आधीपासूनच आहे या यादीत

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये (ICC T20 international world cup 2026) भारतीय फलंदाज अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात तो खातेही उघडू शकला नाही. आपल्या पहिल्या दोन टी-20 वर्ल्ड कप सामन्यांमध्ये शून्य धावांवर बाद होणारा तो जगातील तिसरा आणि भारतातील दुसरा खेळाडू ठरला आहे.

अभिषेक शर्माच्या आधी अशी कामगिरी भारताचा आशिष नेहरा (Ashish Nehra) आणि बांगलादेशचा इमरुल कायस यांच्या नावावर होती. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या टी-20 वर्ल्ड कप कारकिर्दीत एकही धाव काढू शकले नव्हते आणि आतापर्यंत अभिषेकची अवस्थाही तशीच आहे.

आपल्या पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात अभिषेक पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. आजारपणामुळे तो नामिबियाविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पुनरागमन केले, पण 4 चेंडू खेळून तो शून्यावर माघारी परतला.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात अभिषेकने 52.50 च्या सरासरीने 105 धावा केल्या होत्या. मात्र, आता 4 डावांत त्याच्या नावावर पाकिस्तानविरुद्ध 110 धावा असून त्याची सरासरी 27.5 पर्यंत खाली आली आहे. गेल्या 5 टी-20 डावांचा विचार केल्यास, अभिषेकने केवळ 98 धावा केल्या असून तो तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे.

Comments are closed.