तर आम्ही अणू करार करू, इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना काय दिली ऑफर?
इराण आणि अमेरिका यांच्यातील अनेक वर्षांच्या तणावानंतर आता राजनैतिक पातळीवर महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेने इराणवर लादलेले जाचक आर्थिक निर्बंध हटवल्यास, इराण आपल्या अणू कार्यक्रमाबाबत तडजोड करण्यास आणि करारावर पुन्हा चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत इराणने दिले आहेत. इराणच्या या भूमिकेमुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराणचे उप-परराष्ट्र मंत्री माजिद तख्त-रवांची यांनी एका मुलाखतीदरम्यान ही भूमिका स्पष्ट केली. “जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकारात्मक पाऊल उचलले आणि इराणच्या अर्थव्यवस्थेची कोंडी करणारे निर्बंध शिथिल केले, तर इराण अणू करारातील अटींवर पुन्हा वाटाघाटी करण्यास तयार आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. इराणने आपल्याकडील युरेनियमच्या ६० टक्के शुद्ध साठ्यावर मर्यादा आणण्याची तयारी दर्शवली आहे, जे अण्वस्त्र निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते.
इराणने याबाबत बोलताना आपली एक बाजू स्पष्ट केली आहे. अणू कार्यक्रमावर चर्चा करण्यास तयारी असली तरी, इराण आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर किंवा प्रादेशिक धोरणांवर कोणतीही तडजोड करणार नाही, असे इराणने सांगितले आहे.
Comments are closed.