फुटबॉलचे कट्टर वैर आता क्रिकेटच्या मैदानात, सुपर एटसाठी इंग्लंड-इटलीमध्ये आज चढाओढ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन वेळचा विजेता इंग्लंड सोमवारी ईडन गार्डन्सवर इटलीविरुद्ध आरपारच्या लढाईसाठी सज्ज आहे. ‘क’ गटामधील हा शेवटचा सामना असून दोन्ही संघांसमोर लक्ष्य एकच आहे, ते म्हणजे सुपर आठमध्ये दणक्यात प्रवेश. फुटबॉलमधील कट्टर वैर आता क्रिकेटच्या मैदानावर धगधगणार आहे.

काल स्काॅटलंडवर दबावात मिळवलेल्या विजयाने इंग्लंडची लय सापडल्याची चिन्हे दिसली. 153 धावांचा पाठलाग करताना टॉम बँटनचे संयमी अर्धशतक निर्णायक ठरले. चेंडूंना उसळी देणाऱ्या खेळपट्टीवर अनेक फलंदाज स्वीपमध्ये बाद झाले, पण बँटनने सरळ फटक्यांवर भर देत परिपक्व खेळी साकारली. मात्र फिल सॉल्ट, जोस बटलर आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांच्यात सातत्याचा अभाव चिंतेचा मुद्दा आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरचा वेग, आदिल रशीद-लियाम डॉसनची फिरकी जोडी प्रभावी ठरली. हीच धार इटलीविरुद्धही कायम ठेवावी लागेल.

दुसरीकडे, पदार्पणात नेपाळवर 10 विकेट्सनी विजय मिळवल्याने इटलीचा आत्मविश्वास उंचावला आहे. वेन मेडसन दुखापतीतून परतणार का, याकडे लक्ष आहे. जस्टिन-अँथनी मोस्का आणि हॅरी-बेन मानेन्ती या भावांच्या जोडीने दमदार कामगिरी केलीय तर क्रिशन कालुगमागेची फिरकी धोकादायक ठरतेय. त्यामुळे ईडनवरचा लढत ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.

Comments are closed.